कथक संकल्पनेवर रंगणार 16 वा ‘शनिवारवाडा नृत्य व संगीत महोत्सव’

एमपीसी न्यूज – रसिक पुणेकरांसाठी नृत्य आणि त्याबरोबरच सुरेल संगीताचा अनोखा आविष्कार घेऊन येणारा ‘शनिवारवाडा नृत्य व संगीत महोत्सव’ येत्या रविवारी (दि. 5 मार्च) शनिवारवाड्याच्या प्रांगणात होणार आहे. तसेच यंदाचा महोत्सव कथकमधील नावीन्यपूर्ण प्रयोगांवर आधारित होणार असल्याची माहिती महोत्सवाच्या संयोजिका सबिना संघवी यांनी आज (सोमवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

हा महोत्सव सायंकाळी 6.00 वाजता सुरू होणार असून यंदाचे महोत्सवाचे हे 16 वे वर्ष आहे. प्रसिद्ध कथक नृत्यांगना मनीषा साठे व महोत्सवाच्या आयोजन समितीच्या सदस्या गायत्रीदेवी पटवर्धन, नीलम सेवलेकर आदी यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी सबिना संघवी म्हणाल्या की, “दरवर्षी प्रमाणे शनिवारवाडा महोत्सवाच्या निमित्ताने रसिक पुणेकरांना ताल, लय, सूर, उत्कृष्ट पदन्यास यांचा सुरेख संगम अनुभविण्याची सुवर्णसंधी यंदाच्या 16 व्या वर्षीही मिळणार आहे. कथकमधील नाविन्यपूर्ण प्रयोग हे यावर्षीच्या महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. ज्यामध्ये ‘बहुकोन’ व ‘सुरतालांगीकम्’ हे कलाविष्कार उपस्थितांसमोर सादर केले जातील.’’ याबरोबरच महोत्सवात शहराबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथक कलाकार आपला सहभाग नोंदवणार आहेत.

प्रेरणा देशपांडे यांच्या ‘नृत्याधाम’ या ग्रुपच्या वतीने सादर गणेश वंदनेने महोत्सवाला सुरुवात होणार असून यानंतर ‘सुरतालांगीकम्’ हा नृत्याविष्कार उपस्थितांसमोर सादर होईल. कथकचे सूर, ताल, अंगीकम् या तीन अंगांवर आधारित ‘सुरतालांगीकम्’ हा एक पारंपारिक कथक प्रकार असून या महोत्सवाच्या निमित्ताने तो पुणेकरांसमोर सादर होईल.  या नृत्यप्रकाराची संकल्पना व दिग्दर्शन हे प्रसिद्ध कथक गुरु प्रेरणा देशपांडे यांचे असून त्या स्वत: त्यांच्या ‘नृत्याधाम’ गृपसोबत या नृत्यप्रकारचे सादरीकरण करणार आहेत.     

याशिवाय ‘कदंब’ या ग्रुपच्या वतीने ‘बहुकोन’ हा नृत्यांगना कुमुदिनी लाखिया प्रस्तुत नृत्याविष्कारही या महोत्सवा दरम्यान सादर होणार आहे. ज्यामध्ये गत- गती, सुवर्ण, शिवतांडव, अभिनय व तराणा यांचा समावेश असेल. यावेळी संयुक्ता सिन्हा, रुपांशी कश्यप, मिताली ध्रुवा, भक्ती दानी, मानसी मोदी, मिहिका मुखर्जी, कृतिका घाणेकर आदी कलाकार आपली नृत्यप्रस्तुती करतील. या नृत्याविष्काराचे दिग्दर्शन स्वत: कुमुदिनी लाखिया यांनी केले असून अतुल देसाई यांनी संगीत, हरीश उपाध्याय यांनी प्रकाशयोजना केली आहे.

महोत्सवासाठी युएसके फाऊंडेशन हे मुख्य प्रायोजक असून 5 एफ वर्ल्ड, वेकफिल्ड, मोर मिस्चीफ स्टाईल लाउंज, द ओ हॉटेल, 94.3 रेडिओ वन, प्युअर गोल्ड फाईन चॉकलेट यांच्या मदतीने महोत्सव पार पडणार आहे.

 

या महोत्सवाच्या सशुल्क प्रवेशिका या 28 फेब्रुवारीपासून 4 मार्चपर्यंत जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर, औंध, सानेवाडी येथील डीव्हीडी एक्स्प्रेस, कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोरेगाव पार्क येथील दि ओ हॉटेल या ठिकाणी तर 5 मार्चला सकाळी 11 वाजल्यापासून शनिवारवाडा येथे उपलब्ध असणार आहेत. याशिवाय www.bookmyshow.com या संकेतस्थळावर देखील तिकिटे उपलब्ध होऊ शकणार असल्याचे यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.