गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

पुण्यात 16 मार्च पासून होणार ‘जलोत्सव’

राजेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्‌घाटन

एमपीसी न्यूज – ‘रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131’ यांच्या वतीने दिनांक 16 मार्च ते 23 मार्च दरम्यान सात दिवसीय ‘जलोत्सव’ (वॉटर फेस्टीव्हल) चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘रोटरी क्लब ऑफ पुणे हिल साईड’च्या अध्यक्ष प्रतिभा घोरपडे आणि ‘जलोत्सव’ (वॉटर फेस्टीव्हल) चे संयोजक सतीश खाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या सात दिवसीय जलोत्सवाचे उद्‌घाटन गुरूवार, दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जलक्रांतीचे प्रणेते राजेंद्र सिंह यांच्या हस्ते होणार आहे. ‘श्रमिक पत्रकार भवन’च्या ‘कमिन्स हॉल’, गांजवे चौक येथे हा कार्यक्रम होईल. या जलोत्सवामध्ये मान्यवरांची मार्गदर्शक व्याख्याने सायंकाळी 5.30 ते 8.30 या वेळात होणार आहेत.

शहरी नागरिकांमध्ये जल साक्षरता निर्माण व्हावी, तसेच उद्योग, प्रशासन, धोरण कर्त्यांसाठी, शेतकर्‍यांसाठी, रोटेरियन्ससाठी आणि पुढच्या पिढीसाठी या जलोत्सवाच्या माध्यमातून जल साक्षरता निर्माण होऊन हे कार्य पुढे चालू रहावे या प्रमुख उद्देशाने या ‘फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले असल्याचे ‘फेस्टिव्हल’चे संयोजक सतीश खाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या महोत्सवामध्ये अनेक मान्यवर पाणी विषयक विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये ‘शेती व पाणी’, पाणी आणि वैज्ञानिक चमत्कार, ‘पुण्याचे पाणी’, ‘पाणी आणि समाज मन’, ‘इंडस्ट्रीमधील पाण्याचा पुनर्वापर’, ‘पाणी आणि विकास’, ‘हवामान बदल आणि पाणी’ या विषयांचा समावेश आहे.

 डॉ. राजेंद्र सिंह, पोपटराव पवार (हिवरे बाजार), खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण, डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. सुनील पिंपळीकर (एम.आय.टी.महाविद्यालयाचे सिव्हिल इंजिनियर विभागप्रमुख), अभिजित घोरपडे (पत्रकार), विवेक वेलणकर (‘सजग नागरिक मंच’चे अध्यक्ष), व्ही.एम. रानडे (महाराष्ट्र राज्य सिंचन विभागाचे माजी सचिव), पराग करंदीकर (ज्येष्ठ पत्रकार), मिलिंद बोकील (लेखक), विनोद बोधनकर (जल बिरादरी), बी. बी. ठोंबरे (इंडस्ट्रीतील पाणी नियोजनाचे तज्ज्ञ), रावसाहेब बढे (फाऊंडेशनचे भारतीर पातळीचे प्रकल्प समन्वरक), डॉ. दि. मा. मोरे (सिंचन विभागाचे माजी सचिव), प्रदीप आपटे (अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक) आदी मान्यवर ‘जलोत्सव’ (वॉटर फेस्टिव्हल’) मध्ये मार्गदर्शन करतील.

पाणी विषयक क्षेत्रात काम केलेल्या स्वयंसेवी संस्थाचा या फेस्टिव्हलमध्ये गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये WOTR (पुणे), ‘ग्राम गौरव’- पाणी पंचायत (सासवड), ‘जीवित नदी’ (पुणे), ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ (लातूर), ‘नाम फाउंडेशन’ (बीड), ‘जलदिंडी’ (पुणे), ‘जल बिरादरी’ (पुणे), ‘वनराई’ (पुणे), ‘जलसंस्कृती मंडळ’ (औरंगाबाद), ‘द ग्रीन थम्ब’ (पुणे), तसेच सी.एस.आर.धोरणातून कार्यरत ‘ल्यूपीन सिग्नेटा’ आणि ‘सिंडीकेट बँक’ या संस्थांचा समावेश आहे. उल्लेखनीय कार्य करणार्‍या अनेक ‘रोटरी क्लब’ चा सन्मान या सप्ताहात करण्यात येणार आहे.

Latest news
Related news