Pimpri: परदेशातून शहरात आलेले 161 जण होम ‘क्वॉरंटाईन’मध्ये

एमपीसी न्यूज – परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 161 नागरिकांना घरीच ‘क्वॉरंटाईन’मध्ये (वेगळ्या कक्षात) ठेवण्यात आले आहे. तर, महापालिकेच्या रुग्णालयात 48 जण दाखल आहेत. त्यातील तीन रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ असून 41 जण संशयित आहेत. ‘एनआयव्ही’ने 48 संशियातांपैकी सात संशयितांचे ‘रिपोर्ट’ दिले असून चार जणांचे रिपोर्ट ‘निगेटीव्ह’ आले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयामध्ये आजपर्यंत दाखल झालेल्या 48 संशयितांच्या घश्यातील द्रावाचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही)कडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी पॉझिटीव्ह असलेल्या तीन रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.

त्याचबरोब चार जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, 41 जणांच्या द्रावाच्या तपासणीचा अहवाल प्रलंबित आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. परदेशातून 21 प्रवासी शहरात आले होते. त्यांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तर, परदेशातून शहरात आलेल्या 161 नागरिकांना घरीच ‘क्वॉरंटाईन’मध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने अभ्यासिका, सार्वजनिक वाचनालये, जिम, नाट्यगृहे, सिनेमागृहे, जलतरण तलाव, उद्याने, सायन्सपार्क 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.