Pimpri : ‘स्वाईन फ्लू’ने पुन्हा काढले डोके वर; 15 दिवसात तब्बल 17 रुग्ण आढळले

काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन; वर्षभरात दोघांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे ‘स्वाईन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या 15 दिवसात पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत स्वाइन फ्ल्यूची लागण झालेले तब्बल 17 रुग्ण आढळले आहेत. तर, वर्षभरात दोघांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण वाढल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

जानेवारी महिन्यात एक आणि गुरुवारी (दि.16 ऑगस्ट)रोजी एकाचा असा दोघांचा वर्षभरात मृत्यू झाला आहे. तर, गेल्या दोन ते तीन आठवड्यात महापालिका हद्दीतील विविध भागात स्वाईन फ्ल्यूची लागण झालेले तब्बल 17 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक रुग्ण अत्यंत गंभीर असून त्याच्यावर चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्ल्युच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्वाईन फ्ल्युला आळा घालण्यासाठी पालिकेच्या दवाखाना, रुग्णालयातर्फे जनजागृती राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, हौसिंग सोसायट्या, सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे. लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे. टॅमीफ्ल्यु गोळ्या, लसेची कमतरात होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिल्या आहेत.

डॉ. रॉय म्हणाले, ‘सर्दी, खोकला असलेल्या व्यक्तीने लक्षणे नाहीशी होईपर्यंत घरीच थांबावे. शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल धरावा. गरम पाण्यात मीठ, हळद टाकून गुळण्या कराव्यात. गरम पाण्याची वाफ घ्यावी. वारंवार हात, साध्या साबणाने व स्वच्छ पाण्याने धुवावेत. शारिरीक मानसिक ताण टाळावा, पुरेशी विश्रांती घ्यावी. आरोग्यदायी आहार घ्यावा. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या, पालेभाज्या या सारख्या सी व ई व्हिटॅमिन असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. धुम्रपान, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे. खोकला, सर्दी असताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.