Happy Journey: चालत, सायकलवर नव्हे तर चक्क विमानाने हे मजूर गेले रांचीला

177 migrant labourers stranded in Mumbai got a free plane to go ranchi

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लागू केला. परंतु, या निर्णयामुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांचे मोठे हाल झाले. अजूनही हजारो मजुरांची दैना सुरुच आहे. सुमारे दीड ते दोन महिन्यांपासून हे स्थलांतरित मजूर ट्रकमध्ये दाटीवाटीने जाताना दिसले, काही चालत, काही सायकलवर किंवा बस, रेल्वेच्या माध्यमातून आपल्या घरी जात आहेत. परंतु, गुरुवारी (दि.28) सकाळी मुंबई विमानतळावर एक वेगळेच दृश्य दिसले. मुंबईत अडकलेले 177 परप्रांतिय मजूर मुंबईहून रांचीला विमानाने गेले. यावेळी या सर्व मजुरांच्या चेहऱ्यावर विमानातून घरी परतण्याचा आनंद दिसत होता. विशेष म्हणजे या मजुरांचा हा विमान प्रवास मोफत होता.

बंगळुरुतील नॅशनल लॉ स्कूलचे माजी विद्यार्थी आणि काही एनजीओंच्या सहकार्याने मजुरांचा हा विमान प्रवास घडला. यासाठी एअर एशिया या विमान कंपनीनेही पुढाकार घेतला. त्यांनीही तिकिटाच्या दरात सवलत देऊन माजी विद्यार्थ्यांना आणि सामाजिक संस्थांना सहकार्य केले.

मुंबईत अडकलेले 177 स्थलांतरित मजूर गुरुवारी सकाळी रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावर उतरले. येथे आल्यानंतर ते फिजिकल डिस्टन्सिंगसह सर्व प्रकारची सावधानता बाळगत विमानतळाच्या बाहेर पडले. यावेळी आपल्या घरी आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. यातील अनेक प्रवासी पत्नी आणि मुलांसह परतले.

रांची विमानतळावर सर्वांत आधी बाहेर येणाऱ्या कमलेश्वरला खूप आनंद झाला होता. कमलेश्वर हा मुंबईत रिक्षा चालवतो. परंतु, लॉकडाऊनमुळे त्याचे काम बंद पडले. त्याचे प्रचंड हाल होत होते. 22 वर्षीय कमलश्वेर आपल्या आई-वडील, भाऊ-बहीण यांना पाहण्यासाठी आतूर झाला होता.

त्याने नॅशनल लॉ स्कूलच्या माजी विद्यार्थिनी प्रियांका राय यांचे आभार मानले. प्रियांका यांनी कमलेश्वरशी फोनवर संपर्क साधला आणि रांचीला जाण्यासाठीचे विमानाचे तिकीट पाठवले. घरी परततोय आणि तेही पहिल्यांदाच विमान प्रवास असा दुहेरी आनंद त्याला झाला होता.

अस्लम अन्सारीची कहाणीही अशीच मिळतीजुळती आहे. तो आपल्या चार मुले आणि पत्नीसह मुंबईत राहत होता. पत्नी घरीच असायची आणि अस्लम मुंबईतील कापड बाजारात शिलाईचे काम करत होता. लॉकडाऊनमुळे हे काम बंद झाले.

सुरुवातीला काही दिवस कसे तरी ढकलले त्यानंतर रांचीला जाण्यासाठी काही सामाजिक संस्था विमानाची सोय करत असल्याचे त्याला समजले. क्षणही न दवडता त्याने त्यांच्याशी संपर्क साधला आणि आपल्या चार मुले आणि पत्नीसह रांचीला पोहोचला. त्यानेही या सामाजिक संस्थेचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.