Pimpri : महापौर निवडीच्या जल्लोषातील भंडा-यामुळे 18 जण जायबंदी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या महापौर निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आनंदोत्सवाची शिक्षा 17 ते 18 जणांना झाली आहे. उत्साही कार्यकर्त्यांनी मुक्त हाताने भंडा-यांची उधळण केल्यामुळे पालिका भंडा-यात न्हाऊन गेली. त्यातच पावसाचा शिडकावा झाल्याने भंडा-याचा चिखल झाला. त्या चिखलावरुन पडल्याने 17 ते 18 जण जायबंदी झाले आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करत रस्ता धुवून काढवा लागला. 

महापौरपदासाठी आज निवडणूक झाली. निवडणुकीमुळे सकाळपासूनच महापौर राहुल जाधव यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पालिकेत जमा झाले होते. निवडणूक प्रक्रिया सुरु होताच ढोल-ताशाचा दणदणाट सुरु झाला. कानठळ्या बसेल एवढा ढोलचा दणदणाट सुरु होता. महापौरपदी राहुल जाधव यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुक्त हाताने भंडा-यांची उधळण केली. त्यामुळे संपूर्ण महापालिका तळमजल्यापासून ते चौथ्या मजल्यापर्यंत भंडा-यात न्हाऊन गेली होती. त्यानंतर विजयी मिरवणूक देखील काढण्यात आली. त्यातच पावसाचा शिडकावा आला. त्यामुळे भंडा-याचा चिखल झाला. त्या चिखलावरुन दुचाकी घसरुन अपघात झाला. चिखलावरुन पडल्याने 17 ते 18 जण जायबंदी झाले आहेत. त्यामध्ये पालिकेतील एका दिव्यांग कर्मचा-याचा देखील समावेश आहे.

चिखलामुळे अपघात होऊ लागल्याने अग्निशामक दलाला पाचारण करावे लागले. संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे दोन बंब पालिका मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी पाण्याने संपूर्ण रस्ता धुवून काढला. तसेच वाहनतळातील गाड्यांवरील भंडारा देखील धुऊन काढला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.