Pimpri : वाहतूक पोलिसांना मिळाल्या 180 ई-चलन मशीन

वाहतूक पोलिसांची कारवाई होणार तीव्र

एमपीसी न्यूज – वाहतूकीचा दंड ई-चलन यंत्राद्वारे स्वीकारला जातो. मात्र, पोलिसांकडे ही यंत्रे कमी प्रमाणात असल्याने कारवाई करण्यासाठी अडचणी येत होत्या. यामुळे जादा ई-चलन यंत्रे देण्याची मागणी पोलीस मुख्यालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार 180 ई-चलन यंत्रे प्राप्त झाल्याने आता वाहतूक पोलिसांच्या कारवाईला आणखी वेग येणार आहे.

वाहतुकीच्या नियमांचा भंग करणा-यांवर पोलीस दंडात्मक कारवाई करताना रोखीने पैसे न घेता एटीएम कार्डद्वारे इ-चलन मशिनने पैसे घेत होते. ज्यांच्याकडे एटीएम कार्ड नाही. त्यांनी जवळच्या वोडाफोन कंपनीच्या दुकानात जाऊन दंड भरण्यास सांगितले जात होते. अनेकदा कारवाई करणा-या पोलिसांकडेही ई-चलन मशिन नसल्याने पोलीस आणि वाहनचालक यांची कोंडी होत असे.

पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाच्या हद्दीत वाहतूक पोलिसांचे दहा विभाग आहेत. तर शहर पोलिसांची 15 ठाणी आहेत. यापूर्वी वाहतूक आणि शहर पोलिसांकडे अवघी 99 ई-चलन यंत्र होती. यामुळे कारवाई करताना पोलिसांना अडचणी येत होत्या. यामुळे आणखी यंत्र देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 180 नवीन ई-चलन यंत्र पोलिसांकडे प्राप्त झाली आहे. यापैकी वाहतूक पोलिसांच्या 10 विभागात प्रत्येकी 15 यंत्र देण्यात येणार असून 15 पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी दोन यंत्रे दिली जाणार असल्याचे वाहतूक विभागाच्या सहायक आयुक्‍त नीलिमा जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.