Pune : एसटीने घेतला पेट; अग्निशमन जवानाच्या तत्परतेमुळे वाचले १९ प्रवाशांचे प्राण

एमपीसी न्यूज – सुट्टीसाठी गावी निघालेल्या पुणे अग्निशामक दलातील कर्तव्यतत्पर जवानामुळे पेट घेतलेल्या एसटीमधील १९ प्रवाशांचे प्राण वाचले. पुणे ते महाबळेश्वर या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसच्या केबिनमधे आज सकाळी जुन्या कात्रज बोगद्याजवळ आग लागली असता या जवानाने प्रसंगावधानता राखून बसमधील प्रवाशांचे प्राण वाचवले.

योगेश चव्हाण असे या कर्तव्यतत्पर जवानाचे नाव आहे. चव्हाण हे कोथरुड अग्निशमन केंद्रात कार्यरत आहेत. चव्हाण हे आपली ड्युटी संपवून सकाळी आठच्या सुमारास आपल्या मूळ गावी साताऱ्याला मोटारसायकलवरून निघाले होते. जुन्या कात्रज बोगद्याजवळ पुणे ते महाबळेश्वर या एसटी बसच्या केबिनमधे आग लागल्याचे त्यांनी पाहिले.

त्यांनी त्वरित याबाबतची माहिती अग्निशामक दलाला कळवली. तसेच घाबरलेल्या प्रवाशांना धीर देत त्यांना बाहेर घेऊन प्रथम रस्त्यालगत असणाऱ्या वाळूचा वापर करुन आग विझवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु, वाळूच्या कमतरतेने आग विझवणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर एका चारचाकी वाहनाला थांबवून त्यांनी त्यामधील फायर एक्शि्टिगंविशर वापरुन आग पूर्ण विझवली.

आग विझताच एसटी चालक वाहक व प्रवासी यांनी सुटकेचा श्वास घेत जवान योगेश चव्हाण यांचे आभार मानले. त्याचवेळी कात्रज अग्निशमन केंद्राचे वाहन या ठिकाणी दाखल झाले. आगीचे कारण नेमके समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.