Hinjawadi : फेक कॉलद्वारे बँकेची गोपनीय माहिती घेऊन 19 हजारांची फसवणूक
एमपीसी न्यूज – एसबीआय बँकेमधून मॅनेजर बोलत असल्याची बतावणी करून बँकेची गोपनीय माहिती घेऊन खात्यावरून 18 हजार 980 रुपये काढून घेतले. हा प्रकार 24 मे रोजी हिंजवडी येथे घडला.
जयकुमार मणी (वय 46, रा. हिंजवडी, फेज 3) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयकुमार हिंजवडी येथील एका खाजगी कंपनीमध्ये काम करतात. 24 मे रोजी ते कंपनीत काम करत असताना त्यांना 9821089962 या क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने तो एसबीआय बँकेतून मॅनेजर बोलत असल्याची बतावणी केली. जयकुमार यांना त्यांच्या ‘क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट 3 हजार 200 रुपये मिळाले आहे. त्यासाठी क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती हवी आहे’, असे त्या व्यक्तीने सांगितले.
बँकेतून मॅनेजर बोलत असल्याने जयकुमार यांनी फोनवरील व्यक्तीला बँकेची गोपनीय माहिती दिली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने जयकुमार यांना आयव्हीआर कॉल करून सीव्हीव्ही नंबर टाईप करण्यास सांगितले. जयकुमार यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी घेऊन फोनवरील व्यक्तीने जयकुमार यांच्या खात्यातून 18 हजार 980 रुपये काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.