Pune : १९ वे साहित्यिक कलावंत संमेलन २८,२९ डिसेंबरला; माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रकट मुलाखत रंगणार

गोडबोले आणि खासदार डॉ. कोल्हे यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा शनिवार दिनांक २८ आणि रविवार दिनांक २९ डिसेंबरला साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या १९ व्या साहित्यिक कलावंत संमेलनात रसिकांना विविध कार्यक्रमांची पर्वणी मिळणार असून या संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध लेखक आणि संत साहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे भूषविणार आहेत. या संमेलनानिमित्त प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि प्रसिद्ध अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यंदा या संमेलनात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रकट मुलाखत रंगणार आहे, अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रतिष्ठानचे सचिव वि.दा. पिंगळे, उपाध्यक्ष राजेंद्र वाघ, व्यवस्थापक सचिन वाघमारे उपस्थित होते.

दिलीप बराटे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे हे संमेलन होणार आहे. यानिमित्त आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (दि. २८) सकाळी ९.३० वा. प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांच्या हस्ते, तर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‌घाटन सकाळी १० वा. प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वा. १९ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्‌घाटन राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी १९ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखक आणि  संत साहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी दुपारी दोन वाजता प्रसिद्ध लेखक बबन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये मकरंद टिल्लू आणि रविंद्र कोकरे सहभागी होणार आहेत.

‘लोकसाहित्य आणि संस्कृती’ दुपारी चार वाजता या विषयावर डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून त्यामध्ये प्रा.वैजनाथ महाजन, मुकुंद कुळे आणि प्रा.एकनाथ पगार सहभागी होणार आहेत. तर संध्याकाळी ६ वाजता अभिनेत्यांशी गप्पा या कार्यक्रमात ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील कलाकारांची प्रकट मुलाखत होणार आहे. त्यामध्ये माधव अभ्यंकर (अण्णा), प्रल्हाद कुडतरकर (पांडू), शकुंतला नरे (माई), अधिश पायगुडे (पाटणकर) या कलाकारांशी राजेश दामले संवाद साधणार आहेत.

यानंतर रात्री ८ वा. ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कवी संमेलनात शशिकांत हिंगोणेकर, मीरा शिंदे, विजय सातपुते, जगदिश कदम, धनंजय सोलंकर, प्रा. पांडुरंग कंद, कविता क्षीरसागर, म.भा. चव्हाण, संजय बोरूडे, पुरूषोत्तम सदाफुले, धनंजय तडवळकर, मोहन शिरसाठ, लीनता माडगुळकर, अंकुश आरेकर आणि अलका जोशी आदी सहभागी होणार आहेत.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त ‘जीवनगाणे’ हा त्यांच्या गीतांवर आधारित संगीतमय कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम गायिका चैत्राली अभ्यंकर आणि गायक हेमंत वाळूंजकर सादर करणार आहेत. दुपारी २ वा. प्रा. वासुदेव मुलाटे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी भाषाः दशा आणि दिशा’ या विषयावरील परिसंवादात डॉ. केशव देशमुख, प्रा. मिलिंद जोशी आणि दीपक पवार सहभागी होणार आहेत.

दुपारी ४ वा. यंदाच्या वाग्यज्ञे साहित्य व कला गौरव पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या हस्ते होणार आहे. यंदाचा साहित्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांना,  तर कला क्षेत्रासाठीचा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी रूपये अकरा हजार असे स्व. रमेश गरवारे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप आहे. रात्री ८ वाजता कवी लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होईल. त्यामध्ये डॉ.मनोहर जाधव, दुर्गेश सोनार, बण्डा जोशी, प्रकाश घोडके, रवी पाईक, कल्पना दुधाळ, प्रा. प्रदीप पाटील, भरत दौंडकर, संजीवनी तडेगावकर, संजय घाडगे, संतोष काळे, रसूल पठाण आणि माधव हुंडेकर सहभागी होणार आहेत.

शरद पवार यांची मुलाखत जीत मैदनावर

या संमेलनात रविवारी (दि २९) सायंकाळी ६ वाजता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची प्रकट मुलाखत होणार असून त्यांच्याशी खासदार संजय राऊत संवाद साधणार आहेत. मुलाखतीचा हा कार्यक्रम जीत मैदान, वनाज कंपनीसमोर, किनारा हॉटेल जवळ, पौड रोड, कोथरूड, पुणे येथे होणार आहे.

हे संमेलन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून त्याचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे आणि प्रतिष्ठानचे सचिव वि.दा.पिंगळे, उपाध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.