Nigdi : भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाच्या विद्युत कामासाठी पावणे तीन कोटी खर्च 

स्थायी समितीची आयत्यावेळी मान्यता 

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात बांधण्यात येणा-या ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपुलाच्या विद्युत कामासाठी दोन कोटी 67 लाख 32 हजार 407 रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत आयत्या वेळी मान्यता देण्यात आली. 

भक्ती-शक्ती चौक ते दापोडी हा रस्ता पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे विकसित करण्यात आला आहे. या मार्गावर सार्वजनिक बीआरटीएस बस वाहतूक सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. परंतू, या ठिकाणी असलेल्या चौकामुळे लहान मोठे अपघात नेहमीच होत होते. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून  वाहतुकीची कोंडीही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी या चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी 90 कोटी रुपये खर्च येणार आहे.

या उड्डाणपुलावरील विद्युत कामासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये यश इलेक्ट्रो लाईन, न्यु सोलर इलेक्ट्रीक्स & इलेक्ट्रोनिक्स, सुमी इलेक्ट्रीकल सर्व्हिस, एस.टी.इलेक्ट्रीकल प्रा. लि आणि मनिषा इंजिनिअर्स प्रा.लि या पाच ठेकेदारांच्या निविदा आल्या होत्या. त्यापैकी यश इलेक्ट्रो लाईन या ठेकेदाराची निविदा रकमेच्या तीन कोटी 14 लाख 75 हजार 812 पेक्षा 15.07 टक्के कमी दराची निविदा प्राप्त झाली होती.

यश इलेक्ट्रो लाईन ठेकेदाराची निविदा तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने आणि ठेकेदार मुदतीमध्ये काम मानांकनाप्रमाणे पूर्ण करण्यास सक्षम असल्याने प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी 31 जुलै रोजी ही निविदा स्वीकारली. त्यानंतर हा प्रस्ताव आज झालेल्या स्थायी समितीसमोर आयत्यावेळी मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्यानुसार यश इलेक्ट्रो लाईन या ठेकेदाराकडून दोन कोटी 67 लाख 32 हजार 407 रुपयांमध्ये काम करुन घेण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.