Bhosari : खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – विरोधात साक्ष दिल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका व्यक्तीकडे 25 हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच त्याला जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 15) सायंकाळी सव्वासहा वाजता फुगेवाडी येथे घडली.

अभिजित उर्फ सनी खंडागळे (वय 30), विकी यादव (वय 25, दोघे रा. गुलाबनगर, दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रणजित शंकर गायकवाड (वय 45, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी गायकवाड यांना फोनकरून भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर ‘तू माझ्याविरोधात साक्ष का दिली’ असे म्हणत आरोपींनी गायकवाड यांना शिवीगाळ केली.

गायकवाड यांच्याकडे आरोपींनी 25 हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. गायकवाड यांच्यावर कोयता उगारून ‘मी इथला भाई आहे’ असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.