Pune News : पिंपरी- पुणे प्रवास होणार सुखकर!

हॅरिस ब्रीज ते अंडी उबवणी केंद्रापर्यंतच्या 2 किलोमीटरच्या रस्ता रूंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गातील हॅरिस ब्रीज ते अंडी उबवणी केंद्रा पर्यंतच्या 2 किलोमीटरच्या रस्ता रूंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या रूंदीकरणासाठी आवश्‍यक असलेली जागा महापालिकेस देण्यास खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने अखेर मान्यता दिली आहे. त्यामुळे सध्या 21 मीटरचा असलेला हा रस्ता आता 42 मीटर रूंद होणार आहे. त्यामुळे या दोन किलोमीटरच्या टप्प्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून दोन्ही शहरातील लाखो नागरिकांची मुक्तता होणार आहे.

मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यापासून गेली सहा वर्षे या रस्ता रुंदीकरणाच्या परवानगीसाठी महामेट्रो आणि महापालिका प्रयत्नशील होती. मेट्रोचे काम व रस्ता रुंदीकरण एकाचवेळी व्हावे, यासाठी तत्कालिन खासदार अनिल शिरोळे आणि विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी संरक्षण मंत्र्यांसोबत अनेकदा बैठक घेतली, निवेदनेही दिली. मेट्रो प्रकल्प केंद्र सरकारचा असल्याने, मेट्रो प्रकल्पाला संरक्षण विभागाने दोन वर्षापूर्वी परवानगी दिली, मात्र महापालिकेला परवानगी मिळाली नव्हती. त्या बदल्यात तेथे शंभर कोटी रुपये खर्चून पुल बांधण्याची अट संरक्षण विभागाने घातली होती. आता तेवढी जागा देण्याच्या बदल्यात रस्ता रुंदीकरणाची परवानगी देण्यात आली आहे.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयापासून (सीओईपी) हॅरीस पुलापर्यंतचा 5.7 किलोमीटर लांबीचा रस्ता 42 मीटर रुंदीचा होईल. सीओईपी ते रेंजहिल्स चौकदरम्यानचा अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता 42 मीटर रुंदीचा आहे. तेथून खडकी हद्दीतील 2.2 किलोमीटर लांबीचे रुंदीकरण आता करण्यात येईल. त्यानंतर बोपोडीतील उर्वरीत रस्त्याचे काही काम झाले आहे, तर थोड्या जागेचा ताबाही महापालिकेला लवकरच मिळणार आहे.

हॅरीस पुलानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत दहा लेनचा रस्ता झाला आहे. त्यामुळे, तेथे बीआरटीसाठी स्वतंत्र मार्ग बनविला आहे. सीओईपीपासून हॅरीस पुलापर्यंत बीआरटी बससेवेसाठी रस्त्याच्या मध्यभागी स्वतंत्र मार्गही आखण्यात आला आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील जागा त्यासाठी उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे रेंजहिल्स येथे बसथांब्यासाठी पाया घेण्यात आला. मात्र, ते काम महापालिकेच्या अधिकाऱयांनी थांबविले. या रस्त्याचे रुंदीकरण व बीआरटीसाठी संरक्षण विभागाने ही जागा दिली आहे. बीआरटीबाबत पुणे महापालिका काय निर्णय घेते ते पहावे लागेल. रस्त्याच्या मध्यभागी बीआरटीच्या दोन लेन, दोन्ही बाजूला सर्व वाहनांसाठी प्रत्येकी दोन लेन, तर कडेला साडेचार मीटरचा सेवा रस्ता, पदपथ व सायकल ट्रॅक अशी योजना येथे केलेली आहे.

महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख व्ही. आर. कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे म्हणाले, की या रस्त्याचे काम करण्याचे आदेश पूर्वी दिले होते. त्यात सुधारणा करावी लागेल. संबंधित ठेकेदार तयार झाल्यास, रस्ता रुंदीकरणास लगेच सुरवात होईल. अन्यथा नवीन निविदा काढाव्या लागल्यास, तीन महिन्यांनी प्रत्यक्ष काम सुरू होईल. मार्गातील जलवाहिनी व अन्य वाहिन्या महापालिका बदलणार आहे. अन्य खर्च महामेट्रोतर्फे करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.