Pimpri: शहरात सलग सहाव्या दिवशी कोरोनाचे रुग्ण, दोघांचे रिपोर्ट ‘पॉझिटीव्ह’; सक्रिय रुग्णांची संख्या 24 वर

सहा दिवसांत 17  नवीन रुग्णांची भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील सहा दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये भर पडत आहे. आज (सोमवारी) आता दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे या दोन पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 24 वर पोहचली आहे. दरम्यान, मागील सहा दिवसांत तब्बल 17  नवीन रुग्णांची भर पडली आहे.

यामधील एक रुग्ण दिल्लीतील तबलीगीच्या कार्यक्रमातून आलेल्याच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहे. एकाचे 23 आणि दुसऱ्या रुग्णाचे 48 वय आहे. दुसरा रुग्ण कोणाच्या संपर्कात आला होता, त्यांची हिस्ट्री काय आहे, याची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

काल रविवारी हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर, दुपारी नर्सच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती अशा पाच जणांना रविवारी एकाच दिवशी लागण झाली होती. तर, 8 एप्रिल पासून शहरात दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. मागील सहा दिवसांत तब्बल 17 नवीन रुग्णांची भर पडली आहे. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन , 12 एप्रिलला पाच आणि आज सोमवारी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 37  जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 24 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 21 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, तीन सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (दि.9) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.