Pune: पुण्यात कोरोना विषाणूचे आणखी तीन ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण, पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पाचवर

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले आणखी तीन पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधून त्यांच्याही चाचण्या घेण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुणे शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दुबईहून पर्यटनावरुन आलेल्या दाम्पत्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा काल निष्पन्न झाले होते. आता त्यांच्या मुलीला तसेच दुबईला गेलेल्या त्यांच्या सहप्रवाशाला तसेच या कुटुंबाने प्रवासासाठी वापरलेल्या मोटारीच्या चालकाला देखील कोरोनाची लागण झाली आहे.  कोरोनाग्रस्त दाम्पत्याला काल नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांचीही तपासणी करण्यात येत आहे.

कोरोना पॉझिटीव्ह दाम्पत्याची मुलगी देखील आई-वडिलांबरोबर दुबईला गेली होती. त्यानंतर कोणताही त्रास न जाणवल्याने तिची तपासणी करण्यात आली नव्हती. आई-वडिलांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या मुलीच्या घशातील स्रावाचे नमुने राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून या मुलीला देखील कोरोना संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या एका सहप्रवाशाला तसेच या कुटुंबाने वापरलेल्या मोटारीच्या चालकाला देखील कोरोना संसर्ग झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले. त्यानंतर या तिघांना देखील नायडू रुग्णालयातील विशेष कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे कुटुंब राहात असलेल्या सिंहगड रोड परिसरातील त्यांच्या घराच्या परिसरात तसेच त्यांनी वापरलेल्या मोटारीत कोरोना विषाणू आढळतात का, याचीही तपासणी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवीन कोरोना विषाणू (कोविड -19) – सद्यःस्थिती आणि उपाय योजना

दुबईहून प्रवास करुन आलेले पुण्यातील दोन प्रवासी काल कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने या रुग्णांनी मुंबई – पुणे प्रवास केला तो टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे तीन निकटसहवासित देखील करोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे, असे शासकीय प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  10 मार्चपर्यंत 1,101 विमानांमधील 1,29,448 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशाहून येणा-या प्रवाशांची तपासणी राज्यातील या तीन विमानतळांवर करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या शिवाय बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इरण, इटली आणि दक्षिण कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या करोना उद्रेक मोठया प्रंआनावर सुरु असल्याने 21 फेब्रुवारीनंतर या देशांतून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण 591 प्रवासी आले आहेत.

ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात 18 जानेवारीपासून आजपर्यंत 304 जणांना भरती करण्यात आले आहे. भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व 289 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर पाचजण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या 304 प्रवाशांपैकी 289 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या 12 जण पुणे येथे तर तीन जण मुंबईत भरती आहेत. नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502 बेडस उपलब्ध आहेत.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे तर मोठया प्रमाणावर कोरोना बाधित असणा-या 12 देशांतून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 591 प्रवाशांपैकी 353 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली,नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर, अमरावती, पालघर,जळगाव,चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यातूनही बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे, असे शासकीय प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

संबंधित बातम्या वाचा –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.