Pimpri: चिंता वाढली! शहरात आणखी दोन कोरोना पॉझिटीव्ह, रुग्णांची संख्या चौदावर

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड शहरात आज (शुक्रवारी) आणखी दोन पुरुषांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी (दि.9) पॉझिटीव्ह असलेल्या महिलेच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील हे दोनही पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. काल तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज दोन नवीन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने मागील दोन दिवसात शहरात कोरोनाचे पाच नवीन रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सक्रिय कोरोना बाधित रुग्णांची संख्या चौदावर गेली आहे. तर, आजपर्यंत शहरात 26 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह होते. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

 

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गुरुवारी (दि. 9) एकाच दिवशी तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये सकाळी एक महिला आणि रात्री एक महिला व पुरुष असे तीन रुग्ण होते. त्यापैकी सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या महिलेच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील दोघांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

 

त्यामध्ये 26 वर्षाचा युवक आणि 45 वर्षीय पुरुषाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 26 वर गेली आहे. 14 सक्रिय रुग्णावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

दरम्यान, दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमातून शहरात आलेल्यांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (दि.2) स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एकाला शुक्रवारी (दि.3) कोरोनाची लागण झाली. त्यानंतर शनिवारी (दि.4) एकाच दिवशी पाच रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये दिल्लीतून आलेल्यांच्या कॉन्टॅक्ट’मधील चार आणि खासगी रुग्णालयातील एकाचा समावेश होता.

 

त्यानंतर दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेल्यांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील बुधवारी (दि.8) आणखी एकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर गुरुवारी (दि.9) एकाच दिवशी तिघांना आणि आज (शुक्रवारी) एकाच दिवशी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.