UPDATE. Pimpri: धक्कादायक,! दिल्लीतून आलेले दोन रुग्ण पॉझिटीव्ह

26 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज – दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमातमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 23 आणि त्यांच्या संपर्कातील पाच नातेवाईक अशा 28 पैकी 2 जणांचे रिपोर्ट कोरोना ‘पॉझिटीव्ह’ आले आहेत. त्यामुळे हे रुग्ण कोरोनाग्रस्त झाले असून शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा वाढला आहे. शहरात कोरोनाचे चार पॉझिटीव्ह रुग्ण झाले आहेत. दरम्यान, दिल्लीतून आलेले आणि संपर्कातील उर्वरित 26 जणांचे रिपोर्ट ‘निगेटीव्ह’ आले आहेत.

दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात तबलीगी जमात या संघटनेच्या वतीने तबलीगी जमात हा कार्यक्रम घेण्यात आला होता. कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. त्यात परदेशातून आलेल्यांची संख्या देखील मोठी होती. कार्यक्रमातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सहाजणांचा तेलंगणामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे देशभर खळबळ उडाली.

पिंपरी-चिंचवड शहरातील 33 लोक या कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती मिळाली होती. त्यापैकी मंगळवारी 14 तर बुधवारी 9 नागरिकांचा शोध लागला. तर, 10 नागरिक शहरात राहत नसल्याचे स्पष्ट झाले. या 23 नागरिकांसह त्यांचे 5 नातेवाईक असे 28 संशयितांना महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे नमुने बुधवारी तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले होते. त्याचे आज रिपोर्ट आले असून 28 पैकी दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे हे रुग्ण कोरोनाग्रस्त झाले असून शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा वाढला आहे.

काय आहे प्रकरण?

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकूण आठ हजार लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्यातील अनेकांमध्ये करोनाची लक्षणे दिसली आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांपैकी 30 जण कोरोना बाधित असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यातील तीन जणांचा काही दिवसांत मृत्यू झाला. या धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील अनेकजण सहभागी झाले होते. औरंगाबाद, अमरावती, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून 33 जण सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.