Dehuroad : चुकीच्या मार्गाने भारतात आणलेले पैसे सोडविण्याच्या बहाण्याने महिलेची 20 लाखांची फसवणूक

जीवनासाथी डॉट कॉमच्या माध्यमातून ओळख करून घेऊन केली फसवणूक

एमपीसी न्यूज – चुकीच्या कारणाने 72 हजार पाउंड भारतात आणले आहेत. ते सोडविण्यासाठी कस्टम अधिका-यांना पैसे द्यायचे आहेत. त्यासाठी पैशांची गरज असल्याचे भासवून महिलेकडून 20 लाख 54 हजार 700 रुपये घेतले. महिलेने याबाबत मुंबई एअरपोर्ट कस्टमर केअरशी संपर्क केला. त्यावेळी इथे असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे समजले. त्यावरून महिलेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

वैशाली मुलचंद ढोणे (वय 35, रा. सेलेस्टीअल सिटी, रावेत, ता. हवेली) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अर्जुन भसीन, मोनिका भसीन, प्रिया भसीन, सुशांत यादव आणि अन्य एक अशा पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली यांनी जीवनसाथी डॉट कॉम या इंटरनेट साईटवर नाव नोंदविले होते. त्या माध्यमातून  वैशाली यांची अर्जुन सोबत ओळख झाली. वैशाली यांच्याशी बोलताना अर्जुनने आपल्या मोनिका आणि प्रिया या दोन बहिणींची ओळख करून दिली. तिघेजण वैशाली यांच्याशी चांगल्या प्रकारे बोलत होते. वैशाली यांचा विश्वास संपादन केल्यानंतर सर्वांनी मिळून 72 हजार पाऊंड एवढे पैसे चुकीच्या मार्गाने भारतात आणले आहेत. ते सर्व पैसे मुंबई विमानतळावरील कस्टम अधिका-यांनी अडविले आहे. ते सोडविण्यासाठी पैशांची गरज आहे. हे भासवून देण्यासाठी सुशांत यादव आणि अन्य एकाने कस्टम अधिकारी व बँक अधिकारी असल्याचे भासविले.

चुकीच्या मार्गाने पैसे आणल्याबद्दल अर्जुनला अटक करण्यात आली असल्याचे सांगून पैसे देण्यास भाग पाडले. वैशाली यांनी वेगवेगळ्या खात्यांवर मिळून एकूण 20 लाख 54 हजार 700 रुपये जमा केले. त्यानंतर हा प्रकार मुंबई विमानतळावर झाला आहे का, याबाबत चौकशी करण्यासाठी वैशाली यांनी मुंबई एअरपोर्ट कस्टमर केअरला फोन केला. त्यावेळी असा कोणताही प्रकार इथे झाला नसल्याची माहिती वैशाली यांना मिळाली. त्यावरून आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.