Pimpri: समन्यायी पाणीपुरवठ्यासाठी 200 कोटीचा खर्च – आयुक्त हर्डीकर 

शहरात 19 टिकाणी पाण्याच्या टाक्या बांधणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर पवना आणि इंद्रायणी खो-यात विभागले आहे. शहराची भौगोलिक पातळी विचारात घेता काही ठरावीक भागात पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यासाठी शहरात 19 ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधाव्या लागतील. या टाक्यांसाठी पाणी वितरण व्यवस्था स्वतंत्र करावी लागेल. या कामासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे.  त्यानंतर शहरात समन्यायी पाणीपुरवठा होईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या हिताचा विचार न करता स्थानिकांच्या व्यापक हितासाठी कटु निर्णय घ्यावे लागतील, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची तहकूब सभा आज ( बुधवारी) पार पडली.  महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. शनिवारी (दि.20) शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर नगरसेवकांनी सहा तास चर्चा केली होती. पंरतु, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी खुलासा केला नव्हता. आज झालेल्या सभेत आयुक्त हर्डीकर यांनी सुमारे तासभर खुलासा केला. वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा, पाण्याची पातळी खालावल्याने गेल्या महिन्यभरापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची कारणीमीमांसा त्यांनी केली.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, गेल्या महिन्याभरात रावेत बंधा-याची पातळी दहा ते बारा वेळा खालवली. वीज पुरवठा वारंवार खंडित झाला. त्यामुळे पंप बंद पडले होते. परिणामी, महिभार शहरातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत झाला. धरणातून पवना नदीपात्रात पाणी सोडल्यास रावेत बंधा-यापर्यंत पाणी येण्यास तब्बल 12 तासाचा अवधी लागतो. त्यामुळे पाण्याची लेव्हल होण्यास विलंब होतो. त्याचा देखील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.

शहराची लोकसंख्या दिवसें-दिवस वाढत आहे. लोकसंख्या वाढीचा आलेख उंचावत असून आजमितीला 22 लाखावर शहराची लोकसंख्या गेली आहे. पाणी सोडण्याच्या व्यवस्थेत सुधारणा, वाढ करणे आवश्यक आहे. सव्वा लाख नळ कनेक्शन शहरात अनधिकृत आहेत. 40 टक्के पाणी हिशोबाह्य आहे. त्यात गळती, चोरी, अनधिकृत नळ कनेक्शनचा समावेश आहे.

वाकड, पिंपळेनिलख, थेरगाव, रहाटणी, ताथवडे, पिंपळेसौदागर, दापोडी, दिघी, मोशी, च-होली, देहू-आळंदी रोड, चक्रपाणी वसाहत, भगतवस्ती, यमुनानगर,  संत तुकारामनगर या भागात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. तिथे स्थानिक अडचणी असल्याचे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, 24 तास पाणीपुरवठा योजनेची तातडीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्याचे काम 30 टक्के पुर्ण झाले असून 70 टक्के शिल्लक आहे. त्या ठेकेदाराकडून प्रभावीपणे काम करुन घेण्यात येणार आहे. कामात हलगर्जीपणा केल्यास ठेकेदारावर जबरी दंडाची कारवाई केली जाणार आहे. तसेच काळ्या यादीत देखील टाकण्याची तरतूद ठेवली आहे.

शहरात टँकर लॉबी मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, पाण्याची चोरी, गळती रोखणे गरजेचे आहे. पाणी चोरी कोठे होते, याचा शोध घेण्यात येईल. पाणी चोर रंगेहाथ पकडले जाणार असून त्यांच्यावर पाणी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

मे महिन्यात पाणी टंचाई होती. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यात येऊ नये असे सांगितले होते. त्यानंतर विभाग प्रमुखांच्या बैठकीत कार्यकारी अभियंत्यानी पाण्याची उपलब्धता पाहून एनओसी देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. चिंचवड मतदार संघातील एनओसी प्रकरणी कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. त्यांचा खुलासा प्राप्त झाला असून तो समाधानकारक नाही.

त्यामुळे त्यांच्याकडून सहशहर अभियंता पदाचा अतिरिक्‍त पदभार काढून घेण्यात आला असून त्यांची चौकशी सुरु आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.