गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

गुंड पाळणे हा मुख्यमंत्र्यांचा आवडता खेळ – खासदार आढळराव

एमपीसी न्यूज – राजकीय घडामोंडीमुळे इंद्रायणीनगर प्रभाग क्रंमाक 8 हा ‘हाय होल्टेज’ प्रभाग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. भोसरीच्या आजी-माजी आमदारांच्या गुंडगिरीचा ‘फैलाव’ या प्रभागात दिसतोय, यांचा बंदोबस्त करण्याची विनंती पोलीस आयुक्त आणि गृहसचिवांना केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करून उपयोग नाही. कारण मुख्यमंत्रीच गुंड पाळत असून गुंड पाळणे हा त्यांचा आवडता छंद असल्याचा घणाघात, शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.

इंद्रायणीनगर प्रभाग क्रंमाक 8 मधील शिवसेनेचे उमेदवार कोमल अजय साळुंखे (अ), पूजा सूरज लांडगे (ब), निलेश रामदास मुटके (क), तुषार भिवाजी सहाणे (ड) यांच्या प्रचारार्थ शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज (गुरुवारी) प्रभागात प्रचार फेरी काढली. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आढळराव बोलत होते.

प्रभाग क्रमांक 8 मध्ये भोसरीच्या आजी-माजी आमदारांच्या गुंडगिरीचा ‘फैलाव’ आहे. त्यामुळे प्रभागात तणावाचे वातावरण आहे. शहरात गुंडगिरी दहशतवाद करणारे प्रस्थापित राजकारणी आहेत. शिवसेना गुंडगिरी, दहशतवादाला घाबरत नसल्याचे खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले. 

गेल्या 15 दिवसांपासून शहरातील नागरिकांचा शिवसेनेकडे कल वाढत आहे. शिवसेनेने सुशिक्षित उमेदवार दिले आहेत. शिवसेनेचे सर्वच उमेदवार स्वच्छ चारित्र्याचे आणि कामाचा अनुभव असलेले आहेत, असे सांगत आढळराव म्हणाले, या प्रभागाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. शिवसेनेचे चारही उमेदवार उच्चशिक्षित आहेत. या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन, त्यांनी प्रभागातील नागरिकांना केले.

बालाजीनगर येथून प्रचार फेरीला सुरुवात झाली. खंडेवस्ती, गणेशनगर, गवळीनगर मार्गे रॅली काढण्यात आली. यामध्ये कामगार नेते हनुमंत लांडगे, शेखर लांडगे, बी.डी. गुंजाळ, संजय गुंजाळ, सुरज लांडगे, बबन मुटके, अजय साळुंखे, विशाल खंदारे, शीतल ढगे, राजश्री लासुरे, हरीदास शिंदे, अमोल भांगे, सुजाता भांगे, अर्चना मुटके, मनीषा गटकळ यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी भगवे फेटे परिधान केले होते. त्यामुळे प्रभाग भगवामय झाल्याचे चित्र आहे.

शिवसेनेच्या उमेदवारांचा एकत्रित प्रचार सुरू आहे. ‘डोअर टू डोअर’ प्रचार, रॅली, पदयात्रा काढल्या आहेत. मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र असून प्रभागात भगव्या वादळाची लाट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.   

Latest news
Related news