सदाशिव पेठेत सामुदायिक दासबोध पारायण सप्ताहास उत्साहात प्रारंभ

कै.गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त दासबोध पारायणाचे आयोजन

एमपीसी न्यूज – जय जय रघुवीर समर्थ चा जयघोष… दासबोध ग्रंथातील स्तोत्र पठणाने दुमदुमलेला परिसर… गं्रथ पठणात तल्लीन झालेले पुणेकर…अशा भक्तीमय वातावरणात दासबोध पारायण सप्ताहाची सुरूवात झाली. ज्येष्ठांसह तरुण वर्ग व विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने पारायणाकरीता सहभाग घेतला आहे.

सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे राष्ट्रीय कीर्तन सम्राट कै. गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त आफळे अकादमीतर्फे दासबोध पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रज्ञा पाडळीकर यांनी दासबोध ग्रंथ पठणाची सुरूवात केली. यावेळी विरेंद्र कुंटे, विनय जोशी, श्रीकांत गोगटे, शैला गोगटे, शुभांगी आफळे आदी उपस्थित होते. पारायणात 50 हून अधिक लोक सामुदायिक पठण करीत आहेत.

प्रज्ञा पाडळीकर म्हणाल्या, दासबोध या ग्रंथात गुरू शिष्याचा संवाद आहे. यामध्ये समर्थांनी मानवाच्या जीवनातील लक्षणे सांगितली आहेत. या ग्रंथामध्ये भक्तीचा मार्ग कसा असावा, हे सांगितले आहे. या ग्रंथाचे श्रवण केल्यास अज्ञान, भ्रम आणि दु:खाचा नाश होतो व परमार्थाचा मार्ग सापडतो. त्यामुळे भक्तीचा मार्ग मिळविण्यासाठी दासबोधाचे श्रवण केले पाहिजे. 

शुभांगी आफळे म्हणाल्या, राष्ट्रीय कीर्तन सम्राट कै. गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त अकादमी तर्फे सोमवार, दिनांक 20 फेबु्वारी पर्यंत विशेष दासबोध पारायण सप्ताहचे आयोजन केले आहे.  सोमवारी पारायणाचा समारोप होणार असून यावेळी डॉ. राम साठ्ये उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. सप्ताहात दासबोध पारायणकरीता प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.