बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

रोमहर्षक लढतीत पीवायसीचा विजय; पूना क्लबवर एका धावेने मात

पूना क्लब वन-डे क्रिकेट लीग


एमपीसी न्यूज – अभिषेक परमारच्या अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी संघाने पूना क्लब वन-डे क्रिकेट लीग स्पर्धेत पूना क्लब संघावर एका धावेने मात केली. पीवायसीने दिलेले 270 धावांचे लक्ष्य गाठताना पूना क्लबला 6 बाद 268 धावाच करता आल्या. पूना क्लबच्या अजिंक्य नाईक आणि अभिषेक राव यांची अर्धशतके व्यर्थ ठरली.

पूना क्लबच्या मैदानावर ही लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना पीवायसीचा डाव 49.1 षटकात 269 धावांत आटोपला. यात करण जाधव (1), दिव्यांग हिंगणेकर (4) झटपट माघारी परतले. अभिषेक परमारने 54, तर अवधूत दांडेकरने 38 धावा केल्या. यानंतर मंदार भंडारी (49) आणि रोहन दामले (49) यांनी झुंजार खेळ केला. पण दोघांचीही अर्धशतके एका धावेने हुकली. अमोघ दाणीने 28 धावांची भर घालून पीवायसीला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. पूना क्लबकडून श्रीकांत मुंढेने चार गडी बाद केले. मागील लढतीत मुंढेने पाच गडी बाद केले होते.

यानंतर पूना क्लबचे सलामीवीर यश नहार आणि अजिंक्य नाईक यांनी दमदार सुरुवात केली. यशने 42, तर अजिंक्य नाईकने 64 धावा जोडल्या. अभिषेक रावने मधल्या फळीला साथीला घेत पूना क्लबला विजयाच्या समीप आणून ठेवले. अभिषेकने 64 धावा केल्या. आशिष सूर्यवंशी आणि अकिब शेखला मात्र पूना क्लबचा विजय साकार करता आला नाही. पूना क्लबला 268 धावाच करता आल्या.

संक्षिप्त धावफलक : पीवायसी – 49.1 षटकांत सर्वबाद 269 (अभिषेक परमार 54, अवधूत दांडेकर 38, मंदार भंडारी 49, रोहन दामले 49, अमोघ दाणी 28, श्रीकांत मुंढे 10-0-76-4, प्रणयसिंग 9-2-37-2, हितेश वाळूंज 8.1-0-39-2) वि. वि. पूना क्लब – 50 षटकांत 6 बाद 268 (यश नहार 42, अजिंक्य नाईक 64, अभिषेक राव 64, विशांत मोरे 38, आशिष सूर्यवंशी नाबाद 19, योगेश चव्हाण 8-0-48-2, अभिषेक परमार 10-0-48-1, रोहन दामले 10-2-45-1, प्रदीप दाढे 7-0-41-1).

spot_img
Latest news
Related news