मावळात उमेदवारांच्या प्रचारासाठी नात्यागोत्यातील मंडळी लागली कामाला

एमपीसी न्यूज – मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगूल वाजले असून प्रचाराला केवळ सहा दिवसाचा अवधी राहिला असल्याने उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून नात्यागोत्यातील मंडळी प्रचार कामात सक्रिय झाली आहेत. घरातील कामे सकाळी लवकरच उरकून ही मंडळी प्रचारासाठी गळ्यात पट्टया अडकवत सज्ज होत आहे.

मावळ तालुका हा भौगोलिक दृष्ट्या वाड्या वस्त्यांचा व दुर्गम भागाचा असल्याने मतदार संघ दूरवर पसरलेले आहे. मतदार संघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे उमेदवाराला शक्य नसल्याने नात्यागोत्यातील मंडळींनी राजकारण बाजूला ठेवत प्रचारकार्यात उडी घेतली आहे. घरोघरी जाऊन प्रचारपत्रके वाटप करणे, भिंतीपत्रके चिटकवणे ही कामे बालचमू मोठ्या उत्साहात करत आहेत. आमूकतमूक हा आपला नातेवाईक आहे. यावेळी पक्ष व राजकारण बाजूला ठेवत नात्यातील मंडळीला मदत करा शेवटी आपलं ते आपलं असतं अस सांगायला देखील नातेवाईक विसरत नसल्याने नात्यागोत्यातील राजकारणाला मावळात मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

नातेवाईकांप्रमाणेच गावकी व भावकी देखील प्रचारात सहभागी झाली असल्याचे चित्र दिसत आहे. पक्ष कोणता का असेना उमेदवार आपल्या गावातील आहे. आपल्या हाकेला तो केव्हाही धावू शकतो हा विचार मनात धरत सध्या गावकीचा प्रचार सुरू आहे. याकरिता अनेक राजकीय पक्षांनी देखील उमेदवार निवडताना मोठ्या गावांना तसेच मोठी भावकी असलेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम दिला आहे.

सोशल मीडिया हे प्रचाराचा सर्वात वेगवान साधन


डिजिटायझेशनच्या जमान्यात सोशल मीडिया हे प्रचाराचे सर्वात मोठे साधन बनले असून या मीडियावरील प्रचारावर निवडणूक आयोगाचे देखील कसलेही बंधन नसल्याने या मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत उमेदवार घराघरात पोहोचले आहे. सोशल मीडियावर सातत्याने उमेदवार व त्यांचे विचार किती महान आहेत याची माहिती देणारे बॅनर कार्यकर्ते पाठवत आहेत. सध्या सर्वच उमेदवारांनी स्वतःचा सोशल मीडिया सेल तयार केला असून ज्या भागात प्रचार सुरू आहे. तेथील प्रचाराची छायाचित्र व गर्दीचे फोटो तातडीने सोशल मीडियावर पाठवत आपल्या उमेदवाराला किती जनाधार आहे. हे देखील दाखविले जात आहे. कालच सर्व उमेदवारांना चिन्ह मिळाल्याने उमेदवाराचे चिन्ह घरोघरी पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य सोशल मीडिया सेल पार पाडत आहे.

फ्लेक्सची जागा घेतली स्क्रिनने

प्रचारासाठी सध्या एलईडी स्क्रिनचा वापर वाढला असून स्क्रिनने फ्लेक्सची जागा घेतली आहे. शिवाय स्क्रिनवर दृक व श्राव्य दोन्ही प्रकाचे प्रचार करता येत असल्याने उमेदवारांचा जाहीरनामा, त्यांचे समाजकार्य व भविष्यात मतदार संघ स्मार्ट बनविण्याच्या कल्पना यांची माहिती स्क्रिनवर चित्रफितीच्या माध्यमातून गावांमधील मंदिरे व चौकाचौकात वाहने उभी करून दिली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.