केडन्स – पी.वाय.सी. यांच्यात रंगणार अंतिम सामना!

पूना क्‍लब करंडक – वन-डे क्रिकेट लीग
एमपीसी न्यूज – यजमान पूना क्‍लबचे आव्हान 79 धावांनी सहज संपुष्टात आणत केडन्स क्‍लबने पूना क्लब वन-डे क्रिकेट लीग स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. विजेतेपदासाठी त्यांची गाठ आता पी.वाय.सी. संघाशी पडेल. 

डेक्कन जिमखान्याच्या मैदानावर आज झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत केडन्स आणि आयोजक पूना क्‍लब संघा दरम्यानच्या सामन्यात रणजी संघातील खेळाडूंनी आपला अनुभवपणाला लावला. प्रथम फलंदाजी करताना केडन्सचा डाव 49.5 षटकांत 259 धावांत संपुष्टात आला. यात जय पांडे 96 चेंडूत 79 आणि रोहित मोटवानी 72 चेंडूंत 65 यांच्या अर्धशतकी खेळीचा वाटा मोठा होता. त्यानंतर शेवटी चिराग खुराना याने 31 चेंडूत 45 धावांची आक्रमक खेळी करत संघाचे आव्हान अधिक भक्कम केले. पूना क्‍लबच्या श्रीकांत मुंढे याने 43 धावांत 5 गडी बाद केले. त्याला धनराज परदेसी याने 44 धावांत 3 गडी बाद करत सुरेख साथ केली. 
 

विजयासाठी  260 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पूना क्‍लबचा डाव 40.3 षटकांत 180 धावांतच आटोपला. केडन्सकडून झालेल्या अचूक गोलंदाजीचा पूना क्‍लबच्या फलंदाजांना सामना करता आला नाही. विशांत मोरेच्या 35 धावा सर्वाधिक ठरल्या. शुभम रांजणे (26) आणि अभिषेक राव (23) यांनाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. केडन्सच्या चिराग खुरानाने 36 धावांत 3 गडी बाद केले. समद फल्ला आणि नितीश सालेकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत त्याला सुरेख साथ केली. 

पी.वाय.सी. विरुद्ध डीव्हीसीए सामन्यात मंदार भंडारीच्या (71) अर्धशतकी खेळीच्या जोरावर पी.वाय.सीने डी.व्ही.सी.ए. संघाचे आव्हान पाच गडी राखून मोडून काढले. डी.व्ही.सी.ए. संघाला 33.3 षटकांत 154 धावांत रोखल्यानंतर पीवायसी ने 35.1 षटकांत 5 बाद 157 धावा करून विजय मिळविला. भंडारीला स्वप्नील फुलपगारच्या 34 धावांची साथ मिळाली. 

संक्षिप्त धावफलक –
डीव्हीसीए 33.3 षटकांत सर्वबाद 154 (ऋतुराज गायकवाड 32, विशाल गिते 50, दिव्यांग हिंगणेकर 3-42, प्रदीप दाढे 2-35) पराभूत वि. पीवायसी 35.1 षटकांत 5 बाद (स्वप्नील फुलपगार 34, मंदारी भंडारी 71, हिरा चौधरी 3-53) 

केडन्स अकादमी 49.5 षटकांत सर्वबाद 159 (जय पांडे 79, रोहित मोटवानी 65, चिराग खुराना 45, श्रीकांत मुंढे 5-43, धनराज परदेशी 3-44) वि.वि. पूना क्‍लब 40.3 षटकांत सर्वबाद 180 (यश नहार 29, शुभम रांजणे 26, अभिषेक राव 23, विशांत मोरे 35, चिराग खुराना 3-36, समद फल्ला 2-43, नितीश सालेकर 2-28)       

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.