भाजपमध्ये जाऊन राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे हेच खरे चोर – विलास लांडे (व्हिडिओ)

‘केलेला विकास आणि जनतेच्या विश्वासावर राष्ट्रवादी हॅटट्रिक करणार’

‘निष्ठावान कार्यकर्त्यांची अवहेलना भाजपला महागात पडेल’

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता भोगून झाल्यानंतर भाजपमध्ये जाऊन राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारेच खरे चोर होते, हे शहरातील जनतेने ओळखले असून या निवडणूक मतदार ख-या चोरांना त्यांची जागा दाखवून देतील, असा दावा पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार विलास लांडे यांनी ‘एमपीसी न्यूज’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शहराचा झालेला विकास आणि जनतेचा विश्वासाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते व कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्यामुळे मूळ भाजपमधील निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी अवहेलना झाली. त्याबाबत नागरिकांच्या मनातही असंतोष दिसून येत आहे. त्याचा मोठा फटका भाजपला बसल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवडचा अक्षरशः कायापालट केला आहे. देशातील सर्वांत सुंदर व विकसित शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडची गणना केली जाते. त्यामुळे शहरात राष्ट्रवादीमय वातावरण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार किती मोठ्या फरकाने विजयी होतात, याचीच आम्ही वाट पाहात आहोत.

गेले ते स्वार्थी, राहिले ते निस्वार्थी

भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची लांडे यांनी खिल्ली उडवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता भोगून झाल्यानंतर भाजपमध्ये जाऊन राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराची भाषा करतात, यावरूनच शहरातील जनतेने खरे चोर कोण हे ओळखले असून या निवडणूक मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व जाती-धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांना विविध पदे देऊन शहरात विकासाबरोबरच सलोख्याचे वातावरण निर्माण केले आहे. राष्ट्रवादीत असताना महत्वाची पदे उपभोगलेले सत्तेची हाव असल्यामुळेच भाजपमध्ये गेले आहेत. सत्तेची लालसा असणारे भाजपमध्ये गेल्यामुळे आता राष्ट्रवादीत खरे व निस्वार्थी कार्यकर्तेच राहिले आहेत. ही मंडळी भाजपमध्ये गेली तरी जनता राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असल्यामुळे त्यांच्या जाण्याचा काहीही फरक पडणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसची हॅटट्रिक होईल, असे लांडे म्हणाले.

गैरसमज दूर झाल्याने विरोधातील कार्यकर्तेही पुन्हा राष्ट्रवादीत

भोसरी विधानसभा मतदारसंघातील आपला पराभव हा स्वपक्षीय कार्यकर्त्यांमधील समज-गैरसमजातून झाला होता. आपल्या विरोधात काम केलेल्या कार्यकर्त्यांना आपण कधीही दुखावले नाही, खुनशीचे राजकारण केले नाही. त्यामुळे त्यांच्या मनातील गैरसमज दूर झाले असून त्यावेळी विरोधात काम कऱणारे बहुतांश कार्यकर्ते आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत आहेत. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस हाच एक नंबरचा पक्ष असेल, असे भाकित लांडे यांनी केले.
राष्ट्रवादीला 65 ते 70 पेक्षाही जास्त जागा मिळतील

राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली असली तरी त्यांना आम्ही समजावून सांगितले आहे. त्यामुळे तशी बंडखोरीची तशी फारशी अडचण राष्ट्रवादीला जाणवणार नाही, असे लांडे यांनी सांगितले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 65 ते 70 किंबहुना त्यापेक्षाही जास्त जागा मिळतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. अजितदादांनी केलेला शहराचा सुनियोजित विकास, सर्वसमावेशक दृष्टीकोन, विकासाचा मास्टर प्लॅन यामुळे येत्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवडचा अधिक विकास होऊन एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे महानगर म्हणून शहराचा नावलौकिक होईल, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरवासीयांना वचन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ठोस निर्णय आणि ठाम कृती याद्वारे पिंपरी-चिंचवडमधील जनतेचा विश्वास कमवला असून त्याला आम्ही कदापि तडा जाऊ देणार नाही, असे लांडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.