गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

आळंदी नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी भाजपचे प्रशांत कु-हाडे

स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे दिनेश घुले व शिवसेनेच्या सविता गावडे यांची निवड 

एमपीसी न्यूज – आळंदी नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी भाजपचे प्रशांत कु-हाडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर (कांबळे) यांनी विशेष सभेनंतर जाहीर केले. यावेळी स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे दिनेश घुले व शिवसेनेच्या सविता गावडे यांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी जाहीर केले.

आळंदी नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्षा उमरगेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वीकृत सदस्य आणि उपाध्यक्ष निवडी साठी विशेष सभा झाली. या सभेत सर्व नवनिर्वाचित सदस्य यांच्यासह मुख्याधिकारी संतोष टेंगले उपस्थित होते.

पालिका सभेत प्रथम उपाध्यक्ष पदासाठी दाखल 3 उमेदवारी अर्जातील माघारीच्या मुदतीत शैला तापकीर (शिवसेना), सचिन गिलबिले(भाजपा) यांनी आपले दाखल वैध उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यामुळे अंतिम मुदतीत एका जागेसाठी वैध भाजपचे प्रशांत कु-हाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तत्पूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष दालनात आले. 

पक्षीय पदवाटप सूत्रानुसार यावर्षी नगरसेवक शिफारस पात्र उमेदवारास स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्याचे धोरणानुसार भाजपच्या वतीने गटनेते पांडुरंग वहिले यांनी पक्षादेशानुसार स्वीकृत सदस्य पदासाठी प्रशासकीय शिफारस प्राप्त वैध पात्र नावातील दिनेश घुले यांच्या नावाची शिफारस केली. शिवसेना आणि भाजपचे आळंदी नगरपरिषद सभागृहातील बळाचा विचार करून प्रत्येकी एक-एक नगरसेवक स्वीकृतसाठी निवडला जाणार आहे. याचा विचार करून शिवसेनेने पक्षीय धोरणाचा आणि पक्षादेशाचा आदर करून पुणे जिल्हाध्यक्ष राम गावडे यांचे पत्नी सविता गावडे यांचे एकमेव नावाची शिफारस गटनेते आदित्य घुंडरे यांनी पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा उमरगेकर यांच्याकडे वैध नावातून केली. 

शिवसेना आणि भाजपच्या पक्षीय बलाबलनुसार एक-एक जागा मिळणार असल्याने तसेच गटनेते यांनी एक-एक नावाचेच शिफारस केल्याने भाजपचे घुले आणि शिवसेनेच्या गावडे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाल्याने पीठासीन अधिकारी यांनी दाखल वैध आणि गटनेते यांचे पत्र शिफारसीयुक्त नामनिर्देशित सदस्य यांची निवड जाहीर केली.

तत्पूर्वी स्वीकृत सदस्य निवडीसाठी दाखल 17 उमेदवारी अर्जातील 6 अर्ज अवैध ठरले. वैध 11 अर्ज अंतिम निवडीसाठी पदनिर्देशित अधिकारी खेडचे प्रांत सुनील गाढे यांनी विशेष सभेपूर्वी छाननी अहवालासह आळंदीकडे पाठविले.अवैध नावात रामचंद्र रंधवे, प्रवीण बवले, दत्तू टेमगिरे, सुरेश झोंबाडे, माधवी चोरडिया, भागवत आवटे यांच्या अर्जाचा समावेश होता. 11 पात्र उमेदवारी अर्जात नंदकुमार कु-हाडे, राणी रासकर, किशोर पवार, दिनेश घुले, उषाबाई दहिफळे, सविता गावडे, दत्तात्रय काळे, संतोष गावडे, नाझीम शेख, ज्ञानेश्वर गुळुंजकर, सचिन काळे यांच्या अर्जाचा समावेश होता. 

आळंदीत स्वीकृतसाठी उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र, आता आळंदीतही पक्षीय अंकुश राहणार असल्याने यापूर्वीसारखी या गटातून त्या आघाडीत आणि परत दुसऱ्या गटात पदासाठी जाण्याचे मार्ग अखेर बंद झाले आहेत. निवडीनंतर सभागृहात नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे उपस्थित होते. निवडीनंतर आळंदीत मिरवणूक आणि फटाक्यांची आतिषबाजी तसेच भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत माउली मंदिरात श्रीचे दर्शन नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी घेतले.

आळंदीच्या विकासाला गती देण्यासह तीर्थक्षेत्र विकासाला चालना देणार – आमदार भेगडे

नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या निवडीनंतर आमदार भेगडे म्हणाले की, आळंदी तीर्थक्षेत्र विकास कामातील त्रुटी दूर करून विकास कामे मार्गी लावली जातील. यात भाविक आणि नागरिक यांच्या पिण्याच्या पाण्याच्या विकास कामास प्राधान्य राहील. आळंदीतील रस्ते, प्रशासकीय इमारत, शाळा, पर्यटक निवास, नदी प्रदूषण कमी करण्याच्या कामास प्राधान्य देऊ, असे सांगत तीर्थक्षेत्र आळंदी विकास आराखड्यातील कामासाठी जिल्हाधिकारी यांचे समवेत आळंदीत 27 फेब्रुवारीला विकास कामाची पाहणी करून विशेष बैठक घेत असल्याचे सांगितले. तत्पूर्वी आमदार भेगडे यांनी येथील पदाधिकारी यांच्या समवेत सुसंवाद साधून येथील विकास कामाची माहिती घेतली. यावेळी माजी नगरसेवक अशोक उमरगेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
Latest news
Related news