बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

कसबा गणपती देवस्थान ट्रस्टच्या महिला प्रमुख विश्वस्तांवर खोट्या स्वाक्षरी घेतल्या प्रकरणी गुन्हा

एमपीसी न्यूज  – श्री कसबा गणपती देवस्थान ट्रस्टच्या महिला प्रमुख विश्वस्तांवर एका तक्रार अर्जावर खोट्या स्वाक्षरी घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानाच्या पाच गणपतींपैकी पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती होय. त्यामुळे या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी गणेश मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत शेटे (वय 48, रा. वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संगीता जठार (वय 42) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुण्यातील पहिला मानाचा गणपती श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. तर आरोपी महिला या ग्रामदैवत श्री कसबा गणपती देवस्थान ट्रस्टच्या प्रमुख महिला विश्वस्थ म्हणून काम पाहतात. देवस्थान ट्रस्टचे कसबा पेठेत मंदिर आहे. तर, गणेशोत्सव काळात गणेश मंडळाच्या वतीने मंदिरासमोर जाहिरात तसेच, पोस्टर लावले जातात. 

त्यामुळे मंदिर झाकून जाते आणि भाविकांना त्याची अडचण होते. याबाबत आरोपी संगीता यांनी देवस्थान ट्रस्टच्या कागदपत्रांवर तक्रार अर्ज केला होता. त्यावर नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या व तो अर्ज सहाय्यक आयुक्त विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय येथे दाखल केला. सहाय्यक आयुक्तांकडून या तक्रारीचा तपास करण्यात आला. त्यावेळी तक्रार अर्जामध्ये स्वाक्षर्‍या करण्यात आलेल्या एका नागरिकाची माहिती घेतल्यानंतर तो मयत असल्याचे निष्पन्न झाले. 

तसेच, इतर नागरिकांना याबाबत विचारले असता, नागरिकांकडून त्या स्वाक्षर्‍या तक्रार अर्जासाठी न घेता, इतर कारणासाठी घेण्यात आल्याचे समोर आले. संबंधित नागरिकांना तक्रार करण्यासाठी स्वाक्षर्‍या घेतल्याचे माहित नसल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर याप्रकरणी शेटे यांनी त्यांच्याविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गणेश मंडळाची व सहाय्यक आयुक्त विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाची फसवणूक केल्याची तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक निरीक्षक व्हि. के. सूर्यवंशी हे करत आहेत.
spot_img
Latest news
Related news