उच्च न्यायालयाने सद्गुरु कदम यांची याचिका फेटाळली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे  प्रभाग क्रमांक 9 मधून अर्ज भरला होता. मात्र, अर्जावर त्यांची स्वाक्षरी नसल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज बाद ठरवला होता. या निर्णयाविरोधात कदम मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. मात्र, उच्च न्यायालयाने तक्रार निकाली काढत कदम यांची याचिका फेटाळली. त्यामुळे कदम यांनी ही निवडणूक लढवता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. 

कदम यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून जागा ड – सर्वसाधारण वर्गासाठी अर्ज भरला होता. मात्र, ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या अर्जावर त्यांची स्वाक्षरी नसल्याचे अर्ज छाननीत समोर आल्याने निवडणूक निर्णय अधिका-यांनी अर्ज बाद केला होता. त्यामुळे कदम यांनी 6 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर न्यायाधीश नरेश पाटील व न्यायाधीश  मकरंद कर्णीक यांनी आज (शुक्रवारी) निर्णय घेत तक्रार निकाली काढली. यावेळी न्यायालयाने कदम यांची याचिका फेटाळली. 

प्रभाग क्रमांक सहामधून काँग्रेसचे विद्यमान कैलास कदम व सद्‌गुरु कदम हे दोन नगरसेवक होते. त्यापैकी कैलास कदम यांनी अर्ज भरला नव्हता. तर सद्‌गुरु कदम यांचा अर्ज बाद झाल्याने काँग्रेसला धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.