सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

दिघी-बोपखेलमध्ये माजी सैनिकांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला पाठिंबा

एमपीसी न्यूज – दिघी-बोपखेल प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला येथील माजी सैनिकांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दिघीमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेली विकासकामे आणि नगरसेवक चंद्रकांत  वाळके यांच्या जनसंपर्कामुळे माजी सैनिकांनी या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत लक्ष्मण इंगळे (अ), बाळू गंगाराम लांडे (ब), वृषाली समीर झपके-घुले (क), कल्पना चंद्रकांत वाळके (ड) यांना पाठिंबा दिला आहे.

दिघीत माजी सैनिकांचा नुकताच एक मेळावा झाला. मेळाव्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय माजी सैनिकांनी घेतला आहे.  या मेळाव्याला माजी सैनिक विलास पाटील, अरविंद येलपले, संभाजी बाबर, भास्कर आम्रे, शिवाजी खेडेकेर, सुरेंद्रसिंग अहिर, विरोबा माने, जगन्नाथ पवार, नाथा जाधव, त्र्यंबक आवटी, कोंडेकर, घुले, साळुंके आदी उपस्थित होते.

दिघीमध्ये माजी सैनिकांची संख्या मोठी असून, अनेक जण खूप वर्षांपासून दिघीमध्येच स्थायिक झाले आहेत. दिघीगाव कोकण मराठा महासंघाच्या सभागृहात माजी सैनिकांचा नुकताच एक मेळावा झाला. या मेळाव्यात दिघी-बोपखेलमधील निवडणुकीची चर्चा करण्यात आली. त्यावेळी दिघीत गेल्या पाच वर्षात झालेल्या विकासकामांचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दिघीला कचराकुंड्यामुक्त करण्यात आले असून, गावातील रस्ते दुर्गंधीमुक्त झाले आहेत. दिघीमध्ये काही भागात पावसाळ्याच्या काळात पाणी मोठ्या प्रमाणात साठत होते. पण यावर उपाय म्हणून पावसाळी गटार बांधण्यात आले आहे. दिघीतील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधेसाठी दवाखाना सुरू करण्यात आला असून, करसंकलन कार्यालही सुरू करण्यात आले आहे. याचा नागरिकांना विशेष उपयोग होतो आहे. दिघीतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले असून, पाणी पुरवठा करणा-या जलवाहिन्याही बदलण्यात आल्या आहेत. या सर्व कामांचा विचार करून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘व्हिजन’ लक्षात घेऊन माजी सैनिकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना  पाठिंबा देण्यात आला आहे.

दिघीत लवकरच बहुउद्देशीय इमारत आकाराला येणार आहे. त्याचाही माजी सैनिकांना उपयोग होणार आहे. त्यामुळे त्याचाही विचार या मेळाव्यात करण्यात आला आणि पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

{fcomment}

spot_img
Latest news
Related news