मानसिक शांतीसाठी श्रद्धा आवश्यक – डॉ. ह. वि. सरदेसाई

श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – मनुष्यप्राण्याला निसर्गाने जो मेंदू दिला आहे. त्यामुळे त्याला आजूबाजूच्या गोष्टींबद्दल कुतूहल निर्माण होते. या कुतूहलामुळेच त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञान, समृद्धी आणि प्रतिष्ठेमुळे लोकप्रियता देखील मिळते. परंतु मानसिक शांती हवी असेल तर श्रद्धेशिवाय पर्याय नाही. कोणतीही लोकप्रियता अथवा समृद्धी मानसिक शांती देऊ शकत नाही. त्यामुळे मानसिक शांतीसाठी श्रद्धा आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ह.वि. सरदेसाई यांनी व्यक्त केले. 

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट येथून आलेल्या श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. सरदेसाई यांना निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुंदा सरदेसाई, संयोजन समितीतील विजय काजळे, विनायक घाटे, अण्णा थोरात आदी उपस्थित होते.  पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष होते. 

डॉ. ह.वि. सरदेसाई म्हणाले, श्रद्धेच्या बाबत अनेक गोष्टी कित्येक शतकांपासून लोक  मानत आहेत. परंतु सत्श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये धूसर रेष आहे. स्वामी समर्थांचे अनुयायी धार्मिकतेसोबत अन्नदान आणि रक्तदान करीत सामाजिकता देखील जपत आहेत, ही अतिशय  चांगली गोष्ट असल्याचे देखील त्यांनी सांगितले.    

भूषण गोखले म्हणाले, डॉ. ह.वि. सरदेसाई यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचा सन्मान माझ्याकडून होणे, ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. जो माणूस त्यांच्याकडे जातो त्याचे केवळ निदान करून उपचार न करता रुग्ण हा नेहमीच निरोगी कसा राहील यासाठी ते काम करतात. असे डॉक्टर शहरात फार कमी प्रमाणात पहावयास मिळतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पालखी सोहळ्यानिमित्त दिवसभर रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.  याशिवाय साईनवनाथ संगीत रजनी, स्वयंप्रकाशी स्वामीगीते, स्वामीगीते स्वर विभुती भक्ती रंग हे कार्यक्रम सादर करण्यात आले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.