शनिवार, डिसेंबर 3, 2022

राष्ट्रवादीतून जे बाहेर पडले त्यांच्यामुळे गटबाजी संपली – विलास लांडे

गुंडाना पाठीशी घालून पिंपरी-चिंचवड भयमुक्त कशी करणार? – विलास लांडे 

एमपीसी न्यूज – जे राष्ट्रवादी सोडून गेले त्यांच्यामुळे पक्षावर कोणताच वाईट परिणाम झाला नाही. उलट ते बाहेर पडले   त्यामुळे पक्षातील गटबाजी संपली अशी आमची भावना आहे, अशी टीका माजी आमदार विलास लांडे यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत केली.

यावेळी राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी उपमाहापौर शरद बो-हाडे, नगरसेविका स्वाती साने आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीचे बरेच नेते पक्ष सोडून गेले त्यांच्यामुळे पक्षात पोकळी निर्माण झाली आहे का? असा प्रश्न विचारला असता विलास लांडे म्हणाले की, या लोकांनी पक्ष सोडला म्हणून आमचा पक्ष स्वच्छ झाला. तसेच पक्षातील गटबाजीही कमी झाली. आता आम्ही एकत्र काम करून न भांडता  महापालिकेत एकहाती सत्ता आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तसेच शिवसेना व भाजपवर टीका करताना लांडे म्हणाले की,  भाजप व शिवसेनेने केवळ पिंपरी-चिंचवड शहरातच नाही तर राज्यातही विकास केला नाही, केवळ गाजर दाखविण्याचेच काम केले. अनधिकृत बांधकामे, रेड झोन, शास्ती कराबद्दल केवळ वल्गना केल्या. शास्ती माफच्या शासन आदेशाबाबतही संभ्रम आहे. नगरविकास खात्याकडे त्याची कोणती माहिती उपलब्ध नाही. हे म्हणतात शहराला शांघाय करू, पण यांनी नागपूरचे काय केले ते  पिंपरी-चिंचवडचे करणार आहेत. तसेच  गुंडांना पाठीशी घालून हे शहर भयमुक्त कसे करणार आहेत? जनतेलाही यांच्या गाजरांची कल्पना आली आहे.

यांच्या पक्षात जाहीरनाम्याबाबतही एकमत नाही मग शहराचा विकास कसा करणार? त्यावरून हे जनतेला फसवत आहेत हे स्पष्ट होत आहे. तसेच यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यातही ज्यांनी आरोप केले त्यांनाच न्यायालयाने 10 लाख भरा, असे सांगितले. कारण यांनी केवळ स्वार्थासाठी  गरीब व मागासवर्गीयांची घरे आडवली होती. जनता या सा-या गोष्टी बघतेय त्यामुळे त्याचा परिणाम 23 तारखेला दिसलेच, असा सूचक इशाराही लांडे यांनी सांगितले.

महापौर भोसरीचाच असेल – लांडे

यावेळी भोसरीतून आमच्या कमीतकमी 30 जागा येतील तर संपूर्ण शहरातून आमच्या 65 ते 70 जागा येतील, असा माझा अंदाज आहे. त्यात महापौर कोण असेल हे अजितदादा ठरवतील मात्र, तो भोसरीचाच असेल याची  100 टक्के खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Latest news
Related news