गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

नेस वाडियामध्ये अभिनेते प्रशांत दामले यांच्या उपस्थितीत अभिनय कार्यशाळेचा समारोप

एमपीसी न्यूज –  पुण्यातील नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालय, नाट्य चित्र मंडळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालामध्ये नुकतीच अभिनय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मराठी सिने सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले उपस्थित होते.

डॉ. शैला डायस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोपप्रसंगी प्रशांत दामले यांनी त्यांच्या जीवनातील नाट्य क्षेत्रातील करिअर घडविताना त्यांना आलेले अनुभव सांगितले, आणि विद्यार्थ्यांनी कुठलेही क्षेत्र निवडताना त्यातील नियोजन आणि त्याची अंमलबजावणी कशी असावी, याचे महत्व सांगितले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, व्यक्तिमत्व विकास व्हावा तसेच त्यांना जीवनमूल्य समजावीत म्हणून अभिनय कार्यशाळेचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यशाळेच्या उद्‌घाटन समारंभाला नाट्य सिने दिग्दर्शक प्रवीण चौगुले, नाट्य सिने अभिनेते प्रदीप भिडे तसेच चित्रपट क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून कार्यरत असलेले आणि नेस वाडिया महाविद्यालाचे माजी विद्यार्थी धनंजय भावलेकर उपस्थित होते.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रकाश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये अभिनयासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक हालचाली, आवाजाची लवचिकता, चेहऱ्यावरील भाव यांचे महत्व सांगण्यात आले आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडून अभिनय करवून घेण्यात आला. तसेच अनेक कलाकृतीच्या व्हिडिओ क्लिप्स दाखविण्यात आल्या.

कार्यक्रमाची प्रस्तावना समन्वयक प्राचार्या डॉ. शैलजा देवबागकर यांनी केली. डॉ. अंबादास भोसले, डॉ. वृषाली रणधीर, प्रा. जस्मिन शिकलगर, प्रा. सुर्यकांत फल्ले यांनी या कार्यशाळेचे काम पहिले.
Latest news
Related news