एमपीसी न्यूज – महानगरपालिकांच्या निवडणुका 21 फेब्रुवारीला होणार असून खाजगी कंपन्यांमधील कामगारांनाही मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळावी, अशी मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यामध्ये समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी निवदेनामध्ये म्हटले आहे की, निवडणूक आयोग तसेच पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासन शहरामध्ये सर्वत्र प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजवावा प्रबोधन करीत आहे.
परंतु निवडणूक आयोगाच्या या प्रयत्नांना खासगी कंपन्यांच्या धोरणामुळे अनेक कामगारांना मतदानापासून वंचित रहावे लागेल. किंवा वेळेअभावी मतदान करण्याची इच्छा असूनही त्या कामगारांना मतदान करता येणार नाही.
तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील 45 टक्के मतदार हे कामगार आहेत. यातील बरेच कामगार हे चाकण, तळेगाव येथील कंपन्यांमध्ये कामास आहेत. मतदानाचा मूलभूत हक्क बाजावण्याकरिता फक्त 2 तासांचा वेळ कामगारांना दिला तर जाण्या येण्यास व मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास वेळ अपुरी पडण्याची शकयता नाकारता येत नाही. अशा खासगी कंपन्यांच्या चुकीच्या धोरणामुळे मतदानाच्या टक्क्यांवर परिणाम होऊ शकतो.
बजाज ऑटो सारख्या अनेक मोठ्या कंपन्या चाकणमध्ये आहेत. त्यामुळे खाजगी कंपन्या मालकांनीही लोकशाही बळकट करण्यासाठी 21 तारखेस सुट्टी जाहीर करावी. व त्या बदल्यात इतर सुट्टीच्या दिवसाचे कामाचा दिवस भरून काढण्याचे नियोजन करावे. त्यामुळे कंपनीचेही होणारे नुकसान टळू शकेल.
त्यामुळे खाजगी कंपनी मालक व प्रशासनास सुट्टी जाहीर करण्याकरिता समितीच्या वतीने आवाहन केले जात आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्र्यांनीही याबाबत कडक पावले उचलावीत व सर्व संबधित विभागांना सूचना द्याव्या तसेच महापालिका आयुक्तांनीही याबाबत अहवाल महाराष्ट्र शासनास पाठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.