कारागृहातील कैदी म्हणतात बाहेर पडलो की, भाजपमध्ये जाऊन पवित्र होऊ – धनंजय मुंडे

एमपीसी न्यूज –  भाजपने खंडणी, दरोडे, खून, असे विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना पक्षात पवित्र करून घेतले आहे. त्यामुळे कारागृहातील कैदीही म्हणतात बाहेर पडलो की, भाजपमध्ये जाऊन पवित्र होऊ, अशी सडकून टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपधील गुंडाच्या प्रवेशावर (आकुर्डी) येथील जाहीर सभेत  केली. 

प्रभाग क्रमांक 14 आकुर्डीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जावेद रमजान शेख (अ), माधूरी संजय जगताप (ब), वैशाली जालींदर काळभोर (क) उल्हास शंकर शेट्टी (ड) यांच्या प्रचारार्थ मुंडे यांची आकुर्डीत सभा झाली. आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात मुंडे यांनी भाजप- शिवसेनेवर सडकून टीका केली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी, नगरसेवक निलेश पांढरकर, अॅड. गोरक्ष लोखंडे, प्रसाद शेट्टी, फजल शेख, सेवादलाचे अध्यक्ष आनंदा यादव आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडमधील सगळ्याच पक्षात राष्ट्रवादीचे सुभेदार आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या ‘त्या’ नेत्यांमुळे भाजपची बांडगूळ आधी आमच्यावर टीका करत होते. आता तेच तिघे त्यांच्या पक्षामध्ये आहेत, हे कसे चालते, असा सवाल उपस्थित करत मुंडे म्हणाले. भाजपने शहरात ‘भयमुक्त शहर आणि भ्रष्टाचार मुक्त शहर’ असे फलक लावले आहेत. भाजपमध्ये अनेक सराईत गुन्हेगारांनी प्रवेश केला आहे. भाजपवाले स्वत:ला पार्टी विथ डिफरन्स म्हणत होते, आता स्वत:ला ‘पार्टी विथ डिफरन्स’ देखील म्हणत नाहीत. 

देशाचे नेते शरद पवार यांचे पहिल्यापासून पिंपरी-चिंचवड शहरावर प्रेम आहे. शहरात उद्योग उभे करत त्यांनी महानगर केले. औद्योगिकनगरी म्हणून शहर नावारुपाला आले. अजित पवार यांनी शहराचा नियोजनपुर्वक विकास केला आहे. मराठवाड्यातील बांधव शहरात येऊन स्थायिक झाले आहेत. मराठवाड्यातील लोकांना पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी खूप प्रेम दिले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन, मुंडे यांनी केले. 

भाजपचे शहरासाठी काय योगदान! 

भाजप सरकार जनतेचा विचार करत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पिंपरी-चिंचवडचा विकास करत आहे. नागपूरकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले होते. त्यांनी विरोधी पक्षात असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा द्वेष केला आहे. आत्ता म्हणतात पिंपरी-चिंचवडचा विकास झाला नाही. शहराची गणना देशातील 250 महापालिकांमधील तिसरी महापालिका गणली जात आहे. महापालिकेला केंद्र सरकारचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भाजपने दोन वर्षात शहरासाठी काय केले आहे. भाजपचे शहरासाठी काय योगदान आहे, असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला.

"dhanajay
"dhanajay

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.