पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पाच हजार पोलीस ताफ्यासह पुणे ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

पुणे जिल्ह्यात तेरा तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद (75 गट) आणि पंचायत समितीसाठी (गण 150) येणार्‍या मंगळवारी (21 फेब्रुवारी) मतदान होत आहे. यासाठी एकूण मतदान केंद्र (बुथ) 3 हजार 444 असून, दोन हजार 189 इमारतींमध्ये हे मतदान होणार आहे. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. तर, संवेदनशील म्हणून पोलिसांनी 171 मतदान केंद्र काढली असून, त्यावर अतिरिक्त बंदोबस्त असणार असून, विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच, 150 गाड्यांमधून मतदानादिवशी पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. तसेच, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. गुरुवारी (23 फेब्रुवारी) 12 ठिकाणी मतमोजणी होणार असून, मतमोजणीनंतर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तेथेही चोख बंदोबस्त असणार आहे.

बंदोबस्ताचा तपशील

एक पोलीस अधीक्षक, 2 अपर अधीक्षक, 13 उपअधीक्षक, 58 पोलीस निरीक्षक, 189सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, 3704 पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या, 1250 होमगार्ड असा फौजफाटा बंदोबस्तासाठी लावण्यात आला आहे. वनविभागाकडून 71 वनरक्षकांनाही बंदोबस्तासाठी असतील. संपूर्ण जिल्ह्यात 1 क्यूआरटी पथक, 2 दंगाविरोधी पथके तयार नेमण्यात आली आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यातूनही एक सहाय्यक अधीक्षक, 5 पोलीस उपअधीक्षक, 19 पोलीस निरीक्षक, 21 सहाय्यक निरीक्षक आणि 1605 पोलीस कर्मचार्‍यांचा ताफा मागवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.