पुण्यात शिवछत्रपतींना सरदारांच्या वंशजांकडून भव्यदिव्य मानवंदना

लालमहालाजवळ अलोट जनसमुदाय ; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवजन्मोत्सवात 51 स्वराज्यरथ

एमपीसी न्यूज – शिवजन्मस्थळाची आकर्षक सजावट असलेला जिजाऊशहाजी शिवज्योत रथ… एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फुर्ती देणारे 51 स्वराज्यरथ… महाराणी ताराराणी शौर्य पथकातील 51 रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना… 51 रणशिगांची ललकारी… ढोलताशांचा रणगजर… सनई-चौघडयांचे मंगलमय सूर… हजारोंच्या संख्येने पारंपरिक पोशाखात उपस्थित महिला… आणि शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा वातावरणात शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्य मिरवणुकीचे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, करवीर संस्थानाचे यौवराज शहाजीराजे संभाजीराजे छत्रपती, मिस्टर युनीव्हर्स संग्राम चौगुले, रिंकल अमित गायकवाड तसेच समितीच्या महिला सदस्यांच्या हस्ते लालमहालातील जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार घालून जिजाऊशहाजी रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, अतिरीक्त आयुक्त राजेंद्र जगताप, अ‍ॅड. प्रताप परदेशी, परागमामा मते, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते. मिरवणुकीचे यंदा 5 वे वर्ष आहे.

मिरवणुकीत जिजाऊशहाजी शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, नाईक निंवगुणे, जैताजी नाईक करंजावणे, कडु शिक्केकरी, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सुर्याजी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे, गंभीरराव, सप्तसहत्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, गरुड घराणे, चंद्रवंशी ( भोपतराव ) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला धारदेवास, महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, समशेर बहाद्दर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार, श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार या स्वराज्यघराण्यांचे रथ त्यांचा गौरवशाली इतिहास सांगत सहभागी झाले होते.

भारताच्या इतिहासात प्रथमच सुरु झालेल्या 51 रणरागिणींच्या महाराणी ताराराणी शौर्य पथकाचे उद््घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले. शिवगर्जना ढोलताशा पथकाच्या वादनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. शिवगर्जना पथकाने मतदान करा, उद्याचं उज्ज्वल भविष्य घडवा अशा फलकांद्वारे मतदान जनजागृती केली. शिवकालीन मदार्नी युध्दकलेची प्रात्यक्षिके कोल्हापुर व पुण्यातील नामांकीत पथकांनी सादर केली. याशिवाय प्रभात बँड देखील मिरवणुकीत सहभागी झाला होता. तसेच सरलष्कर हंबीरराव मोहिते, सरदार गोदाजी जगताप या पराक्रमी स्वराज्यसैनानिंच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण देखील मान्यवरांच्या हस्ते झाले.

सोहळ्याचे जनक, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचे नियोजन गिरीष गायकवाड, दिपक घुले, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, दत्ताभाऊ पासलकर, शंकर कडू, दिग्वीजय जेधे, महेश मालुसरे, रणजीत शिंदे, निलेश जेधे, गोपी पवार, अनिल पवार, समीर जाधवराव, दिपक बांदल, किरण देसाई, मयुरेश दळवी, तुषार जगताप, मंदार मते, गोविंद पाटील आदींनी केले.

* शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
एसएसपीएमएस शाळेच्या प्रांगणातील श्री शिवछत्रपतींच्या पुतळयावर हेलिकॉप्टरमधुन पुष्पवृष्टी करण्यात आली. पुष्पवृष्टीचे हे सहावे वर्ष असून यौवराज शहाजीराजे संभाजीराजे छत्रपती, ईशान अमित गायकवाड, रिंकल अमित गायकवाड, सुभाष सरपाले यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली.

"shivaji
"shivaji

"shivaji

"shivaji

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.