च-होलीत भाजप महिला उमेदवाराच्या घरासमोर टाकल्या काळ्या बाहुल्या

एमपीसी न्यूज – महापालिका निवडणुकीसाठी मतदान अवघ्या दोन दिवसांवर आल्याने प्रचार शिगेला पोहोचला असतानाच प्रतिस्पर्धी उमेदवाराला जेरीस आणण्यासाठी वाट्टेल ते मार्ग अवलंबले जात आहेत. आरोप-प्रत्यारोपांपर्यंत मर्यादित असलेला प्रचार आता काळ्या जादूपर्यंत येऊन ठेपला आहे. च-होलीतील भाजपच्या महिला उमेदवाराच्या घराजवळ तसेच बुथ लावण्याच्या ठिकाणी काळ्या बाहुल्या टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे.

महापालिका निवडणुकांचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराला नामोहरम करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या मार्गाचा अवलंब केला जात आहे. आरोप-प्रत्यारोपांनी राळ उडवून दिली आहे. मात्र, हा प्रचार आता काळ्या जादूपर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे निवडणूक लढविणा-या उमेदवारांमध्ये खळबळ माजली आहे. मोशी-च-होली प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपच्या उमेदवार शैला मोळक निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काळ्या जादूचा प्रयोग करण्यात आला आहे. त्यांच्या घरात तसेच, ज्या ठिकाणी त्यांनी बूथ लावण्याचे नियोजन केले आहे. त्या ठिकाणी काळ्या बाहुल्या टाकण्यात आल्याचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. या काळ्या जादूच्या प्रयोगामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मोळक या भाजपच्या पिंपरी – चिंचवड महिला आघाडीच्या शहराध्यक्षा आहेत. सुरुवातीला त्यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यामुळे मोळक समर्थकांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात निदर्शने केली होती. मात्र, नंतर त्यांना तिकीट देण्यात आले. आता त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार असल्या तरी पक्षातील एका गटाचा त्यांना विरोध आहे. अधिकृत उमेदवार असूनही इतर तीन उमेदवार त्यांच्यासोबत प्रचार करताना दिसत नाहीत, अशा स्थितीत हे काळ्या बाहुल्यांचे प्रकरण घडल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

याबाबत दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे म्हणाले की, याबाबत आमच्याकडे कोणतीच तक्रार आली नाही. त्यामुळे कोणाविरोधत गुन्हा दाखल केला नाही. 

 
 
 
 


MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.