उमेदवारीसाठी दिलेली रक्कम परत करा; भाजप कार्यकर्त्यांचे पक्ष कार्यालया बाहेर आंदोलन

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या निवडणूक मतदानासाठी काही तास शिल्लक असताना आज भाजप कार्यलयाबाहेर प्रभाग क्रमांक 12, 13 आणि 14 मधील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्जासाठी दिलेली रक्कम परत करावी. या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट हे कार्यलायात होते. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमधील नाराजी काही दूर होत नाही, हे यातून स्पष्ट होत आहे.

यंदाच्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यात प्रामुख्याने सुसंकृत आणि शिस्त प्रिय भाजपमध्येच अधिक घडामोडी घडल्या. या पक्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे निष्ठावंताना मोठ्या प्रमाणावर डावलण्यात आल्याचा प्रकार समोर आला. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी डावलण्यात आलेल्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर धरण आंदोलन करीत  शहर अध्यक्षाच्या फ्लेक्सवर शाई फेकून निषेध नोंदविला. यानंतर नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढत पक्षाच्या प्रचारामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांना केले. 

पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी काम केले. मात्र, आज मतदानाला काही तास शिल्लक असताना पक्ष कार्यालयाबाहेर प्रभाग क्रमांक 12,13 आणि 14 मधील नाराज कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत निषेध नोंदविला. प्रभाग क्रमांक 13 मधील ओंकार कदम म्हणाले की, या निवडणुकीमध्ये उमेदवारी तुम्हाला निश्चित असल्याचे सांगत कामाला सुरुवात करा, असे सांगण्यात आले. मात्र, घरोघरी जाऊन प्रचार देखील करण्यात अला. मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला असून अर्जासाठी 11 हजार रुपये भरण्यात आले. आमची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे किमान अर्जाचे 11 हजार रुपये द्यावे, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.