व्यास गुरुकुलातील आठवणीत रमला आफळेबुवांचा शिष्यवर्ग

कै. गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 1955 ते 65 च्या वर्गातील विद्यार्थ्यांचे संमेलन


एमपीसी न्यूज – पहाटेचे प्रात:स्मरण… माधुकरी मागून मिळविलेल्या जेवणाचा एकत्रितपणे घेतलेला आस्वाद… संस्कृत स्तोत्रांपासून उदकशांतीसारख्या पूजेपर्यंत मिळालेले धडे आणि मल्लखांब, पोहण्यासारख्या व्यायाम करण्याकरिता उद्युक्त केलेल्या गोविंदस्वामी उर्फ नानांनी केलेले संस्कार आज आमच्या जडणघडणीत मोलाचे ठरले, असे सांगत नानाविध आठवणींमध्ये व्यास गुरुकुलातील (सध्याचे नारद मंदिर) 50 वर्षांपूर्वीचा शिष्यवर्ग रमला. 

निमित्त होते, सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे राष्ट्रीय कीर्तन सम्राट कै. गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त आफळे अकादमीतर्फे व्यास गुरुकुलातील 1955 ते 65 साली असलेल्या विद्यार्थ्यांच्या संमेलनाचे. यावेळी सुधाकर थत्ते, वासुदेव आपटे, डॉ. दत्तराजशास्त्री वाडदेकर, डॉ. अरुण प्रभुणे, सतिश गुर्जर, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, क्रांतिगिता महाबळ, प्राची मोडक, रेवा खडकीकर आणि इतर माजी विद्यार्थी उपस्थित होते. पुण्यासह मुंबई, ठाणे, डोंबिवली, बदलापूर, महाड, आळंदी आणि बेळगाव येथून 35 हून अधिक विद्यार्थ्यांनी संमेलनाला हजेरी लावली. 

डॉ. दत्तराजशास्त्री वाडदेकर म्हणाले की, गोविंदस्वामी आफळेबुवांनी राज्यभर केलेल्या कीर्तनातून गरीब मुलांचे संगोपन आम्ही करू, असा प्रचार केला. त्यानुसार अनाथ, गरीब मुलांना पुण्यामध्ये सदाशिव पेठेतील व्यास गुरुकुलात एकत्र करीत त्यांना शिक्षण दिले. पहाटे 4.30 पासून गुरुकुलातील दिनक्रम सुरू होत असे. माधुकरी मागून जेवण करायचे आणि बाराही महिने थंड पाण्याने अंघोळ करायची, त्यासोबतच संध्या आणि स्तोत्रपठण होतेच. त्यामुळे लहानपणापासून आम्हा सर्वच विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार झाले, ते आफळेबुवांमुळेच.  

डॉ.अरुण प्रभुणे म्हणाले, कै. गोविंदस्वामी आफळे यांनी स्वत: हालअपेष्टा सहन करून शिक्षण घेतले. ते कष्ट गरीब मुलांना सहन करावे लागू नये, यासाठी गुरुकुल स्थापन केले. गुरुकुलामध्ये वासंतिक वर्ग होत असत. त्यामध्ये ब्राह्मणस्पती सुक्त, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती, सौरसुक्त, पुरुषसुक्त, उदकशांत यांसारख्या अनेक गोष्टी शिकविल्या जात. त्यासोबतच महाराष्ट्र मंडळात व्यायामाचे धडेही मिळत होते. त्यामुळे एक उत्तम नागरिक घडविण्याकरिता साकारलेल्या गुरुकुलात पुन्हा एकदा एकत्र आल्याचा आम्हाला आनंद आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.