पुण्यात महिला मतदारांचा मेंदी काढून होणार सन्मान

महिला आणि तरुणींचा मतदानाचा टक्का वाढावा याकरिता प्रयत्न 

मृगनयनी मेंदी आर्टस् आणि साईनाथ मंडळ ट्रस्टचा पुढाकार

एमपीसी न्यूज – लोकशाहीमध्ये 50 टक्के सहभागी असणा-या महिला आणि तरुणींनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, यासाठी मृगनयनी मेंदी आर्टस् आणि साईनाथ मंडळ ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. मतदान केल्यानंतर लागणा-या निळ्या शाईप्रमाणेच नक्षीदार मेंदीने महिलावर्गाचा अनोखा सन्मान केला जाणार आहे. शहराच्या मध्य भागातील दोन ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मृगनयनी मेंदी आर्टसच्या संचालिका आणि लिम्का बुक मध्ये विक्रम करणाऱ्या धनश्री हेंद्रे यांनी सांगितले.


उद्या मंगळवार, दिनांक 21 फेब्रुवारी रोजी विविध शाळांमध्ये मतदान केंद्र कार्यरत असतात. त्यामुळे बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर प्रशाला, आदर्श विद्यालय, गोपाळ हायस्कूल आणि नूतन मराठी विद्यालय प्राथमिक व माध्यमिक शाळा येथे धनश्री हेंद्रे आणि त्यांच्या सहकारी महिला मतदारांच्या हातावर मेंदी काढणार आहेत. मंगळवारी, सकाळी 11 ते दुपारी 4 यावेळेत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा आणि कार्यकर्ते मतदानविषयक जनजागृती देखील करणार आहेत.

साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा म्हणाले, मतदान करून लोकशाही बळकट करण्याकरिता नागरिकांनी पुढे यावे  यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. प्रामुख्याने महिला वर्गाला प्रोत्साहित करून मतदानाची संख्या वाढवावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यासोबतच पहिल्यांदा मतदान करणा-या महिला आणि तरुणींना हा मतदानाचा क्षण कायम लक्षात रहावा, यासाठी मेंदी काढून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.