पिंपरी-चिंचवडमधील विक्रमी मतदान कोणाला फायदेशीर?

राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचा स्पष्ट बहुमताचा दावा


शिवसेना म्हणते राष्ट्रवादीला मिळतील सर्वाधिक जागा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून केलेल्या विक्रमी मतदानाने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप नेत्यांच्या मनातील धागधूग चांगलीच वाढवली आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी आपल्याच फायद्याची असून आपल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा दोन्ही पक्षांनी केला आहे.
 
 
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2012 मधील निवडणुकीत 54.84 टक्के मतदान झाले होते. 2007 मध्ये 56.66 टक्के, 2002 मध्ये 59.51 टक्के तर मतदान झाले होते.  1997 मध्ये 68.65 टक्के मतदान झाले होते पण त्यावेळी मतदारांची एकूण संख्या फक्त 3 लाख 94 हजार 931 होती. त्यामुळे यावेळी 65.35 टक्के मतदान झाले असून एकूण मतदारसंख्या 11 लाख 92 हजार 089 इतकी आहे. म्हणजेच यावेळी विक्रमी मतदान झाल्याचे दिसून येते. मागील निवडणुकीपेक्षा यंदा 10.51 टक्के वाढ झाली आहे.
 
 
राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्तित्वाची ही लढाई असल्याने त्यांनी पूर्ण शक्ती पणाला लावली होती. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे केले होते. लक्ष्मण जगताप व महेश लांडगे या आमदारांबरोबरच आझमभाई पानसरे यांच्यासारख्या बड्या नेत्याला आपल्याकडे खेचून भाजपने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन जाहीर सभा घेऊन प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणुकीतील चुरस, प्रचारातील आरोप-प्रत़्यारोपांचा धुराळा यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे पहायला मिळते.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनानेही मतदार जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवली. मतदारांना आवाहन करणारी सेलिब्रिटीजची पोस्टर्स, बैनर्स, व्हिडिओ क्लिप्स, सोशल मीडियावरील कैम्पेन यालाही उल्लेखनीय यश आले. मतदार हेल्पलाईनलाही चांगला प्रतिसाद मिळाला.


भाजपला 70 जागा मिळतील – लक्ष्मण जगताप
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे किमान 70 नगरसेवक निवडून येतील, असा दावा भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला आहे. वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीतून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध मतदारांच्या मनातील रोषच दिसून येतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता परिवर्तन निश्चित झाले आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसला 68 जागा मिळतील – योगेश बहल
राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवडचा कायापालट केला आहे.  त्या कामाची पावती देण्यासाठी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते योगेश बहल यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेला 68 जागांसह स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. इतर पक्षांना किती जागा मिळतील, याबाबत काहीही अंदाज व्यक्त करण्याचे त्यांनी टाळले.


शिवसेना ‘किंग मेकर’ची भूमिका बजावणार – बारणे
या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे भाकित शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केले आहे. शिवसेनेला 30 जागा मिळतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसला 50 ते 55 जागा मिळतील आणि भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाईल, असे भाकितही त्यांनी केले. शिवसेना यावेळी किंग मेकरच्या भूमिकेत पाहायला मिळेल, असेही त्यांनी सूचित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.