एमपीसी न्यूज – तळेगावात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आज पार पडल्या. यामध्ये मिनी आमदारकी म्हणून पाहिल्या जाणा-या इंदोरी-सोमाटणे गटात कमळ फुलणार की घड्याळाची टिकटिक ऐकायला मिळणार, याकडे संपूर्ण तळेगावकरांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या इंदोरी-सोमाटणे गटात अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. या गटात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांत काट्याची टक्कर होणार, असे पहिल्या पासून बोलले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल शिंदे व पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य भाजपचे उमेदवार नितीन मराठे यांच्यात मुख्य अटीतटीची लढत आहे. या गटात कमळ फुलणार की घड्याळाची टिकटिक ऐकायला मिळणार हे गुरूवारी 23 तारखेलाच समजेल.
या गटाकडे पहिल्यापासूनच मिनी आमदारकी म्हणून पाहिले जाते. शिवसेना व काँग्रेसने या गटात उमेदवार उभा केला नसल्याने येथील निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. राजकीय मातब्बर घराण्यामुळे येथे प्रचाराची राळ उडाली. निकालाच्या कौलाबाबत दोन्ही पक्ष आशावादी आहेत.