आईच्या मृत्यूनंतर मुलीने मृत्यूला कवटाळले

एमपीसी न्यूज – आईच्या निधनामुळे आलेल्या नैराश्यातून मुलीने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी (दि.21) सायंकाळी साडेआठच्या सुमारास बावधन येथे उघडकीस आला. 

 मोनिका शर्मा (वय 26, रा. बावधन) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. 

हिंजवडी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ए. ए. डोळस यांनी याबाबत माहिती दिली. मोनिका ही बावधन येथील एका खासगी कंपनीत सेल्स एक्झीक्युटिव्ह म्हणून नोकरी करत होती. मोनिका मूळची मध्यप्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी होती. बावधन येथे ती एकटीच राहत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या आईचे अकाली निधन झाले आहे. आईच्या निधनानंतर तिचे वडील काही दिवस तिच्यासोबत राहत होते. दहा दिवसांपूर्वी ते मध्यप्रदेशला गेले होते. 

मंगळवारी मोनिका कंपनीमध्ये गेली नव्हती. दिवसभर घरीच होती. सायंकाळी तिने राहत्या घरातील फॅनच्या हुकला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री साडेआठच्या सुमारास मोनिकाचा मित्र तिच्या घरी आला होता. त्याने दरवाजा ठोठावला मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा तोडला असता मोनिका गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. 

आत्महत्या करण्यापुर्वी मोनिकाने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यामध्ये आईच्या निधनामुळे आपल्याला नैराश्य आले असून त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे, असे पोलिसांनी सांगितले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.