घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी भाजपच्या राजेश पिल्ले यांच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक नऊमधील भाजपचे उमेदवार आणि माजी नगरसेवक राजेश पिल्ले यांच्या विरोधात घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि.21) सायंकाळी साडेचारच्या सुमारास नेहरुनगर येथील क्रांती चौकात घडली होती.

याप्रकरणी पोलीस नाईक संदीप महादेव मांडवी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार राजेश गोविंदस्वामी पिल्ले (वय 50, रा. अजमेरा, पिंपरी) यांच्याविरोधात मुंबई पोलीस अॅक्ट कलम 37 (1) आर. डब्लू 135, आर्म अॅक्ट कलम 4 (25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात तलवारी, लाठी-काठी, भाले अशी घातक हत्यारे बाळगण्यास बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन करून मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नेहरूनगर येथील राजीव गांधी शाळेजवळ राजेश पिल्ले हे एक लोखंडी तलवार घेऊन आले होते. त्यांच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आल्याचे, पोलिसांनी सांगितले. पिंपरी ठाण्याचे फौजदार आर. एम. घुगे तपास करत आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी मंगळवारी (दि.21) मतदान झाले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास नेहरुनगर येथे प्रभाग क्रमांक नऊमधील भाजपचे उमेदवार राजेश पिल्ले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार राहूल भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. कार्यकर्त्यांनी तलवारी हातामध्ये घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाला मारहाण देखील झाली आहे. त्यावेळी हत्यारे असलेली एक मोटार तिथे आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.