शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

कर्णधार असलो तरी त्याचा खेळावर परिणाम होणार नाही – विराट कोहली

पुण्यात गहुंजे स्टेडियमवर उद्यापासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचा थरार

एमपीसी न्यूज – कर्णधार म्हणून माझ्यावर कोणताही दबाव नसून, ती माझी जबाबदारी आहे. पण त्याचा माझ्या खेळावर देखील कोणताही परिणाम होत नाही. तसेच न्यूझिलंड, इंग्लंड आणि बांग्लादेश विरोधात आम्हाला मिळालेल्या यशात संघातील सर्व खेळाडूंचा महत्त्वाचा वाटा आहे, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

पुण्यात गहुंजे स्टेडियमवर भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी मालिकेला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सरावानंतर विराट पत्रकारांशी बोलत होता.

विराट म्हणाला की, तुम्ही ज्यावेळी तुमच्या खेळात शिस्तपाळता त्यावेळी तुम्हाला कर्णधारपदाचे देखील ओझे जाणवत नाही. माझे देखील काहीसे असेच आहे. कर्णधारपदाचा माझ्या फलंदाजीवर किंवा मी मैदानावर असताना मला कोणताही दबाव जाणवत नाही. त्यामुळे माझ्या खेळावर त्याचा परिणाम होत नाही. पण कर्णधार म्हणून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करावा लागतो. कर्णधार पद कधी मला जबाबदारी वाटते, कधी ती वाटत देखील नाही. स्टिव्ह स्मिथला देखील असेच वाटत असेल, कारण तो देखील एक चांगला फलंदाज आणि चांगला कर्णधार देखील आहे. आणि तो आपल्या संघाला अशाच पद्धतीने पुढे नेतो आहे.

अॅग्रेशनचा कधी, कसा उपयोग करायचा ते कुंबळेकडून शिकतोय

मी माझ्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करत असतो, यात मला प्रशिक्षक अनिल कुंबळे यांची खूप मदत होते. अनिल कुंबळे हे देखील त्यांच्या कारकर्दीत अॅग्रेसिव्ह होते. ते फक्त वर्तवणुकीतच नव्हे तर मानसिकतेने देखील अॅग्रेसिव्ह आहेत. पण या अॅग्रेशनचा कधी, कोठे चांगल्या पद्धतीने उपयोग करायचा हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे मला देखील त्यांची मदत होते. माझ्यातील अॅग्रेशनचा उपयोग कसा, कधी आणि कोणत्याक्षणी करायचा हे मी अनिल कुंबळेंकडून शिकत आहे. ते एक स्पिन गोलंदाज असले तरी जलदगती गोलंदाजांना देखील त्यांच्या भूमिकेत जाऊन चांगले मार्गदर्शन करतात. कोणाला कसे बाद करायचे, कोणाला कसे खेळू द्यायचे या गोष्टी अनिल कुंबळेंना चांगल्या माहिती आहेत. त्यांच्याकडून आम्ही अनेक गोष्टी शिकत आहोत.

सर्वसामने आमच्यासाठी सारखेच आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ आमच्यासाठी वेगळा नाही. त्यांच्यापेक्षा अवघड आव्हान आमच्या समोर इंग्लंडचे होते. ऑस्ट्रेलिया विरोधातील मालिकेला सामोरे जाण्यासाठी आम्ही उत्साही आहोत. सर्व खेळाडूंमध्ये चांगला अत्माविश्वास आहे, आम्हाला काय करायचे आहे ते आम्हाला माहिती आहे. आम्ही आमच्या खेळावर लक्ष केंद्रित केले आहे, असे विराटने नमूद केले.

आम्ही भारताला नक्कीच चांगलीच टक्कर देऊ – स्टिव्ह स्मिथ

भारतीय संघ घरच्या मैदानावर चांगला खेळत आहे. त्यांनी आधीच्या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. आम्हाला त्यांच्याशी सामना करणे नक्कीच कठिण जाईल. पण आमचा संघ देखील भारताला नक्कीच चांगली टक्कर देईल. या मालिकेत आमच्यासाठी काही कठिण प्रसंग येतील पण या परिस्थितीत कसे खेळायचे ते आम्हाला शिकण्यास मिळेल. आम्ही मोठा संघ घेऊन आलो असलो तरी विकेट पाहूनच ‘प्लेईंग ईलेव्हन’चा कशी असेल ते ठरवू. मिचल स्टार्कचा स्पिड चांगला आहे. त्याचा रिव्हर स्विंगचा आम्हाला फायदा होईल. येथील विकेट स्लोअर आणि लोअर असल्याने या विकेटवर रिव्हर स्विंग महत्त्वाचे शस्त्र ठरेल.

श्रीलंकेच्या मालिकेतून आम्ही बरेच काही शिकलो. पण आपण जसे नियोजन करतो, त्या गोष्टी प्रत्येक वेळी होतातच, असे नाही. कधी अटॅक करावा लागतो तर कधी डिफेन्स करावे लागते. पण हे कधी करायचे हे मात्र कळणे गरजेचे आहे. आम्हाला स्थानिक खेळपट्टीवर खेळतो त्या पद्धतीची शैली आम्हाला बदलावयास हवी. वातावरणानुसार खेळ बदलणे आणि त्याचे नियोजन करणे आम्हाला करावे लागेल. फिरकी गोलंदाजीला सामोरे जाणे हेच आमच्या समोरील मोठे अव्हान असेल. पण अश्विन, जडेजा विरोधात खेळण्यास आम्ही सक्षम आहोत. यांचा अभ्यास आम्ही केला आहे. आम्ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवून भारतात आलो आहोत. येथे आम्ही चांगला सराव देखील केला आहे. मागील मालिकेत खराब कामगिरी केल्याचे दडपण आमच्यावर नाही, असे स्मिथने यावेळी सांगितले.

spot_img
Latest news
Related news