आता गद्दार कोण आहे ते स्पष्ट; रेश्मा भोसलेंचा अजित पवार यांना टोला

एमपीसी न्यूज – विजय निश्चित झाल्यानंतर आता गद्दार कोण आहे ते स्पष्ट झाले आहे, असा टोला भाजप पुरस्कृत उमेदवार रेश्मा भोसले यांनी अजित पवार यांना लगावला.

 

पत्नी रेश्मा भोसले यांच्यासाठी आमदार अनिल भोसले यांनी राष्ट्रवादीकडे प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणुकीचे तिकीट मागितले होते. मात्र राष्ट्रवादीने तिकिट नाकारल्यानंतर भोसले यांनी ऐनवेळी भाजपकडून रेश्मा यांच्यासाठी तिकिट खेचून आणले होते.

 

मात्र, अखेरच्या दिवशी फॉर्म भरण्यात झालेल्या गोंधळामुळे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही, असे आदेश मिळाल्यानंतर अखेरीस त्यांना अपक्ष व भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचे निश्चित झाले. 

 

‘गद्दार शब्दालाही लाजवेल’, अशा शद्बांत अजित पवार यांनी त्यांच्या भाजप प्रवेशावर टीका केली होती. या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर आज जनतेने भरघोस मते देऊन त्यांचा विजय निश्चित केला. विजय निश्चितीनंतर रेश्मा भोसले यांनी आता गद्दार कोण आहे ते स्पष्ट झाले आहे, अशी तिखट टीका केली.

 

आगामी महापौर रेश्मा भोसले?

पुणे महापालिका निवडणुकीसाठी 21 तारखेला सर्व उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले होते. आज हा पिटारा उघडला आहे. या पिटा-यातून जनतेने भाजपकडे आघाडी दिल्याचे सध्या चित्र दिसत आहे. 54 जागांवर आघाडी घेत भाजपची विजयाकडे घोडदौड सुरू आहे. त्यामुळे सत्ता हाती आल्यास महापौरपद मिळावे, अशी इच्छा रेश्मा भोसले यांनी व्यक्त केली आहे.

 

मात्र, निष्ठावंतांना डावलून बाहेरून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेकांना तिकिटे देऊन आधीच भाजपने अनेक कार्यकर्त्यांचा रोष ओढावून घेतला आहे. त्यामुळे रेश्मा भोसले या राष्ट्रवादीतून भाजपकडे आल्याने त्यांची ही मागणी पूर्ण होईल का ? हे पाहणे महत्वाचे राहिल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.