शनिवार, डिसेंबर 3, 2022

आर. एस. कुमार यांना पहिल्याच लढतीत अस्मान दाखवून अमित गावडे ठरले ‘जाएंट किलर’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सलग सहा निवडणुका जिंकून सुमारे तीस वर्षे निगडी प्राधिकरण भागाचे प्रतिनिधीत्व करणारे माजी महापौर आर. एस. कुमार यांना पहिल्याच लढतीत अस्मान दाखवून शिवसेनेचे युवा अधिकारी अमित गावडे ‘जाएंट किलर’ ठरले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे कुमार हे चक्क तिस-या क्रमांकावर फेकले गेले.

 

अत्यंत चुरशीच्या समजल्या गेलेल्या या लढतीमध्ये शिवसेनेने अमित गावडे या तरुण शिवसैनिकाची कोरी पाटी मतदारांपुढे धरली आणि शिवसेनेचा हा प्रयोग यशस्वी झाला. आर. एस. कुमार यांच्यासमोर आतापर्यंत पी. डी. पवार, सदाशिव ढोणे, रवींद्र हिंगे, मकरंद ढेरे, गजानन गवळी, बाळा शिंदे, अरुण थोरात, सुरेश लिंगायत, तात्या कदम, शंकर काळभोर, मनोज शिंदे, बापूसाहेब थोरात, लालासाहेब कदम, समीर जवळकर, आबा कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, प्रकाश ढवळे या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला होता. कुमार यांना कोणीही पराभूत करू शकत नाही, अशा पद्धतीची त्यांची प्रतिमा होती.

ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याचा भावनिक प्रचार यावेळी कुमार यांनी केला. पुढील निवडणुकीत कुमार उमेदवार नसतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीर सभेत सांगितले, मात्र मतदारांनी भावनिक प्रचाराला यावेळी प्रतिसाद दिला नाही आणि  कुमार यांची विजयाची परंपरा या शेवटच्या निवडणुकीत खंडीत झाली. गावडे यांना 9 हजार 884, भाजपचे अरुण थोरात यांना 8 हजार 169 तर कुमार यांना 7 हजार 389 मते मिळाली.

गावडे यांनी गेली पाच वर्षे निवडणुकीची पूर्वतयारी केली होती. गावडे हे तरुण असल्याने तसेच ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असल्याने ते परिसरात लोकप्रिय ठरले. सातत्याने लोकसंपर्क ठेवून त्यांनी परिवर्तनाचा नारा दिला. पद्धतशीर प्रभावी प्रचार करून त्यांनी कुमार यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. वर्षानुवर्षे एकाच लोकप्रतिनिधीला कंटाळलेल्या मतदारांनी गावडे या नव्या दमाच्या नेतृत्वाला पसंती दिल्याचे पहायला मिळाले.

गावडे यांच्या दणदणीत यशाने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

"gavde

"gavde

Latest news
Related news