मुख्यमंत्र्यांनी काढला ‘काट्याने काटा’, पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तापरिवर्तन

अजितदादांचा अतिआत्मविश्वास व आत्मविश्वास गमावलेली फौज

बहुसदस्यीय प्रभाग पद्धत व मतदानाची वाढीव टक्केवारी भाजपच्या पथ्यावर

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालून पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दोन वर्षांपासून आखलेल्या काट्याने काटा काढण्याच्या रणनीतीला अखेर यश मिळाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठा सुरुंग लागला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अतिआत्मविश्वास व आत्मविश्वास गमवलेली फौज यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. चार सदस्यीय प्रभाग पद्धत आणि मतदानात10 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तेचे गणित फसले आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तांतराच्या बाजूने कौल देत मतदारांनी नवा इतिहास घडवला.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील यशानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका राष्ट्रवादीकडून खेचून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार काका-पुतण्यांना जोरदार दणका दिला आहे. त्यासाठी त्यांनी खास रणनीती आखून काट्याने काटा काढला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या खांद्यावर भाजपच्या शहराध्यक्षपदाची धुरा देतानाच, त्यांनी अपक्ष आमदार महेश लांडगे यांनाही भाजपमध्ये खेचून आणले. शहरातील ज्येष्ठ नेते अमर साबळे यांना राज्यसभेची खासदारकी दिली गेली तर अॅड. सचिन पटवर्धन यांना राज्यमंत्री दर्जाचे राज्य लेखा समितीचे अध्यक्षपद देऊन शहरातील भाजपची राजकीय ताकद वाढवली.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे नेते आझम पानसरे यांनाही भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला खिळखिळे करून टाकले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या वारंवार येऊन धडकू लागल्याने शहरात भाजपचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास मात्र चांगलाच डळमळीत झाला होता. पिंपरी-चिंचवड शहराचा आपण कायापालट केला असल्यामुळे विकासकामांच्या जोरावर पिंपरी-चिंचवडकर आपल्याला पुन्हा सत्ता देतील, या भ्रमात अजित पवार राहिले. मात्र ते त्यांच्या टीममध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात कमी पडले. राष्ट्रवादीच्या प्रचाराची सर्व धुरा अजित पवार यांच्या एकट्याच्या खांद्यावर राहिली. माजी आमदार विलास लांडे व आण्णा बनसोडे यांनी शहर पातळीवर प्रचाराची सूत्रे हातात घेणे अपेक्षित होते, मात्र बनसोडे फारसे सक्रिय राहिले नाहीत आणि लांडे यांनी पुत्रप्रेमापोटी इंद्रायणीनगर प्रभागातच तळ ठोकला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला विजयापर्यंत नेऊ शकेल, असा एकही स्थानिक नेता सक्रिय नव्हता. त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला.

भाजपकडून केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या उत्तरांनी मतदारांचे समाधान झाले नाही. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील विकासाचा वेग कायम ठेवू शकेल, याविषयी पिंपरी-चिंचवडकरांच्या मनात साशंकता असल्याचेच निवडणूक निकालांवरून स्पष्ट होत आहे. सत्तेच्या माध्यमातून केलेले काम प्रभावीपणे जनतेपुढे मांडण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडली. तिकीटवाटपात झालेल्या चुका आणि काही ठिकाणची प्रबळ बंडखोरी रोखण्यात आलेल्या अपयशामुळे अनेक ठिकाणी जागा गमावाव्या लागल्या.

सत्तेचा पुरेपूर वापर करीत मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आमदारांमध्ये जास्त नगरसेवक आणण्याची चुरस लावून दिली. त्याचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून येते. दोन्ही आमदारांना प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या आश्वासनांबरोबर मंत्रिपदाचे प्रलोभनही आहे. दोघांमध्ये सत्तासंघर्ष होऊ नये म्हणून दोघांवर वेगवेगळ्या प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आयात उमेदवारांना संधी देण्यात आल्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांनी बंडांचा झेंडा उभारला होता, पण हे बंड शांत करण्यात पक्षाचे नेते यशस्वी झाले. आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये फक्त राष्ट्रवादीकडेच आर्थिकदृष्ट्या तसेच सर्वच अर्थाने तगडे उमेदवार असायचे, त्यांच्यापुढे भाजपचे उमेदवार कमकुवत ठरायचे यावेळी राष्ट्रवादीमधून आलेल्या अशा तगड्या उमेदवारांना भाजपने रिंगणात उतरविले आणि निवडून येण्याची क्षमता या एकाच निकषावर उमेदवारी वाटप झाले. त्यात भाजपचे उमेदवार सरस ठरले. 

आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्याबरोबर खासदार अमर साबळे तसेच अॅड. सचिन पटवर्धन, आझम पानसरे यांच्यासह भाजपच्या कोअर टीमने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचारयंत्रणा राबवून मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. राष्ट्रवादीच्या बंद पडलेल्या बँकेत तुमचे मत ठेवण्याऐवजी भाजपच्या बँकेत पाच वर्षांसाठी मत ठेवा, आम्ही शहराचा पाचपट विकास करून दाखवतो, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकरांना दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.