पुणे महापालिकेत भाजपकडून महापौरपदाची संधी कोणाला ?

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्व साधारण महिलेसाठी महापौरपद राखीव असल्याने भाजप कोणाला संधी देणार हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे. भाजपने 81 जागांवर महिलांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी 54 महिला निवडून आल्या आहेत. त्यामधील नगरसेविका मुक्ता टिळक यांना महापौरपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे पुणे महापालिकेच्या महापौरपदी महिला नगरसेविका लवकरच विराजमान होणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट पाहण्यास मिळाली. तशीच लाट राज्यात झालेल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळाली. महापालिका निवडणुकांमध्ये पुणे महापालिकेत भाजपला सार्वधिक यश मिळाले असून 98 उमेदवार निवडून आले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या या निवडणुकीत पानिपत झाले असून दोन्ही पक्ष मिळून 47, शिवसेना 10, मनसे 2, एमआयएम 1 आणि अपक्ष 4, असे मिळून 162 नगरसेवक निवडून आले आहे.

यामध्ये भाजप महापालिकेत सत्ताधारी पक्ष ठरला असून यामुळे भाजपचा महापौर होणार आहे. भाजपकडून नगरसेविका मुक्ता टिळक, वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, माधुरी सहस्त्रबुद्धे ही नावे महापौरपदाच्या शर्यतीमध्ये असणार आहेत. या चारही महिलांमध्ये मुक्ता टिळक यांना संधी मिळण्याची शक्यता असून त्यांची महापालिकेमध्ये चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. तसेच त्यांना भाजप गटनेते पदाचा अनुभव असल्याने त्यांची महापौरपदी वर्णी लागेल. मात्र, यावर पक्ष श्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे पाहणे जरूरीचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.