मावळात चोरटे आले रे चोरटे आले…..

सोशल मीडियावर अफवांना उधाण; नागरिकांमध्ये घबराट  

 

एमपीसी न्यूज – ‘लांडगा आला रे लांडगा आला…’ ही गोष्ट आपण लहानपणी शाळेत असताना  प्रत्येकानेच ऐकली असेल.  मात्र सध्या  या गोष्टीचा प्रत्यय मावळातील नागरिक घेत आहेत. चोरटे आल्याच्या मोठ्या अफवा सोशल मीडियावर फिरत आहेत.  चोरटे या गल्लीतून त्या गल्लीत गेले… चोरट्यांनी अंगाला ऑईल लावले आहे… असे संदेश व्हॉट्‌सअॅप ग्रुपवर फिरत आहेत. त्यामुळे चोरटे आल्याच्या अफवांनी मावळातील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून रात्र-रात्र जागून पहारा दिला जात आहे. 

 

लोणावळा, वडगाव, तळेगाव दाभाडे परिसरात गेल्या एक महिन्यापासून चोरटे आल्याच्या अफवा फिरत आहेत. रात्री आठ- साडेआठ वाजता चोरटे आल्याचे फोन पोलिसांना येत आहेत.  पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होतात. पोलीस घटनास्थळी गेल्यावर चोरटे पळून गेल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते. या दिशेने गेले, त्या दिशेने चोरटे गेल्याचे पोलिसांना सांगितले जाते.  पोलीस पाठलाग करतात मात्र कोणीच आढळून येत नाही.

धारदार हत्यारे घेऊन 10 ते 15 जणांचे टोळके आले आहे. नागरिकांनी पकडू नाही म्हणून त्यांनी अंगाला ऑईल लावले आहे. परिसरातील लाईट बंद करुन चो-या करत आहेत, अशा अफवा गेल्या एक महिन्यापासून वडगाव, लोणावळा, तळेगाव-दाभाडे परिसरात फिरत आहेत. सोश मीडियावर चोरटे आल्याचे संदेश येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे असून नागरिक रात्र-रात्र जागून काढत आहेत. गेल्या 20 ते 25 दिवसांत अशा प्रकारे चोरी झाल्याच्या वडगाव मावळ पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

तळेगाव दाभाडेमध्ये गेल्या 20 ते 25 दिवसांपासून चोरटे आल्याचे फोन येत आहे. तीन हजार चोरटे आल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात तसे काहीच नाही, या केवळ अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मात्र घबराट पसरली आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुट पाटील ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना म्हणाले, चोरटे आल्याच्या केवळ अफवा आहेत. रात्री पोलिसांचे पेट्रोलिंग सुरु असते. नागरिकांना माझा आणि पोलीस अधिका-यांचाही मोबाईल क्रमांक दिला आहे. चोरटे आल्याचा अफवा सुरु झाल्यापासून पोलिसांनी पेट्रोलिंग वाढविले आहे. चोरटे आल्याच्या केवळ अफवा असून यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, त्यांनी नागरिकांना केले आहे.

गेल्या महिन्याभरापासून वडगाव परिसरात चोरटे आल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. रात्री आठ वाजता चोरटे आल्याचे पोलिसांना फोन येत आहेत. आम्ही घटनास्थळी गेल्यावर काहीच नसते. त्यामुळे पोलीस रात्रीची अधिकची गस्त वाढविणार आहेत. चोरटे आल्याच्या केवळ अफवा असून नागरिकांनी याच्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन, वडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप काळे यांनीही केले आहे. तसेच चोरटे आल्याचे खोटे संदेश व्हॉट्स ग्रुपवर फिरवाणा-याविरोधात पोलीस कारवाई करण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.